मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. युती आणि आघाडीतील इच्छुकांनी सुद्धा मतदारसंघात भेटीगाठी सुरु केल्या आहेत. गेल्या निवडणुकीत सर्वच पक्ष वेगवेगळे रिंगणात उतरले होते. त्यामुळेच बाळापुर मतदारसंघात प्रमुख पक्षांच्या युद्धात भरीप बहुजन महासंघाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार यांचा विजय झाला होता. त्यामुळे आता हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी युती आणि आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत वंचितच्या उद्याने आमदार सिरस्कारांना आमदारकीची हॅटट्रिक करण्याची संधी आहे.
गेल्या निवडणुकीत अकोला जिल्ह्यातील पाच पैकी चार विधानसभा मतदारसंघात भाजपला यश मिळाले होते. मात्र बाळापुर मतदारसंघात मोदी लाटेतही भाजपला पराभव स्वीकारावा लागला होता. २०१४ मध्ये या मतदारसंघात प्रमुख पक्षाच्या सर्वच उमेदवारांनी तगडी लढत दिल्याने मतांचे विभाजन झाले आणि भरीप बहुजन महासंघाकडून रिंगणात उतरेलेले बळीराम सिरस्कार दुसऱ्यांदा आमदार झाले. त्यामुळे आता हा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी युती आणि आघाडीकडून प्रयत्न केले जाणार आहे. तर वंचितच्या पाठिंब्याने सिरस्कारांना आमदारकीची हॅटट्रिक करण्याची संधी आहे.
दुसरीकडे, युतीमध्ये भाजपाकडे असलेल्या या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा आहे, तर आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या या मतदारसंघात आता राष्ट्रवादीचे नेते दावेदारी करत आहे. गेल्यावेळी युतीत शिवसंग्रामला सोडलेल्या या जागेवर, अंतर्गत राजकारणामुळे ही जागा ऐनवेळी भाजपाला देण्यात आली होती. त्यामुळे यावेळी शिवसंग्राम पुन्हा भाजपकडे या जागेवर दावा करत आहे.
भरीप बहुजन महासंघाचे विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार यांना लोकसभा निवडणुकीत बुलडाण्यात उमेदवारी देण्यात आली होती. त्यांचा पराभव झाला. मात्र विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून त्यांची उमदेवारी निश्चित समजली जात आहे. त्यामुळे दोन वेळा आमदार राहिलेल्या सिरस्कार यांना मतदार पुन्हा संधी देऊन त्यांची आमदारकीची हॅटट्रिक करणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल.