आमदार भालके 'कन्फ्युज'; पंढरपुरात 'मनसे'ची तयारी जोरात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 05:29 PM2019-09-06T17:29:54+5:302019-09-06T17:39:46+5:30
भालके आणि परिचारक यांना आव्हान देण्यास तोडीस उमेदवार राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडे नाही. त्यामुळे आघाडीत मनसे सामील झाल्यास ही जागा मनसेच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. तशी तयारीही मनसेची सुरू आहे.
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरातील संघटना आणि राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. सध्या विरोधी पक्षातील नेत्यांच पक्षांतर जोरात सुरू आहे. तर अनेक नेत्यांचा अद्याप पक्ष ठरला नाही. अशीच काहीशी स्थिती पंढरपूरमध्ये पाहायला मिळत आहे. येथील काँग्रेस आमदार भारत भालके यांचा अद्याप पक्ष ठरला नाही. परंतु, पंढपूरमधून मनसेची तयारी जोरात सुरू आहे.
पंढरपूर मतदार संघात भारत भालके प्रमुख प्रतिस्पर्धी असतात. परंतु, यावेळी ते भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आमदार प्रशांत परिचारक यांनी सावध भूमिका घेतली आहे. तर मनसेचे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर विधानसभा मतदार संघाचा दौराही पूर्ण केला असून मनसे आघाडीत सामील झाल्यास ही जागा मनसेला मिळावी असा प्रयत्न सुरू आहे. तर भालके यांनी पक्षांतर केल्यास, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे सक्षम उमेदवाराची टंचाई असणार आहे. त्यामुळे मनसेच्या नेत्यांनी या जागेसाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
दरम्यान मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असलेले परिचारक यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचा सूचक इशारा दिला आहे. तर भालके मागील सहा महिन्यांपासून निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. भालके मतदारसंघात ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे येथील लढत पुन्हा एकदा भालकेविरुद्ध परिचारक अशी रंगणार की, तिसराच पर्याय समोर हे गुलदस्त्यात आहे. तरी भालके यांचा पक्ष निश्चित झाल्याशिवाय मतदारसंघाचा अंदाज बांधणे कठिण आहे. तर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या शैला गोडसे यांनीही तयारी सुरू केली आहे. युती फिसकटल्यास, शिवसेनेकडून पर्यायी व्यवस्था तयार ठेवण्यात येत आहे.
एकूणच मतदार संघातील गणित हे भारत भालके यांची भूमिका आणि युतीच्या निर्णयावर बऱ्याच अंशी अवलंबून आहे. मात्र येथील लढत परिचारक-भालके अशीच होण्याची शक्यता आहे. भालके आणि परिचारक यांना आव्हान देण्यास तोडीस उमेदवार राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडे नाही. त्यामुळे आघाडीत मनसे सामील झाल्यास ही जागा मनसेच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. तशी तयारीही मनसेची सुरू आहे.