मुंबई - आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सगळ्याच मतदारसंघातील इच्छुक उमदेवार कामाला लागली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण मतदारसंघ शिवसनेचा बालेकिल्ला समजला जातो. विद्यमान शिवसनेचे आमदार संदीपान भुमरे हे चौथ्यांदा येथून आमदार म्हणून निवडून आले आहे. मात्र यावेळी त्यांची डोकेदुखी वाढली आहे ती, भाजपचे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांच्या निवडणूक लढणारच ह्या भूमुकेमुळे. विशेष म्हणजे गोर्डे यांनी मतदारसंघातील भेटीगाठी सुद्धा सुरु केल्या आहेत.
कधीकाळी कट्टर शिवसैनिक समजल्या जाणाऱ्या दत्ता गोर्डेंना लोकसभा निवडणुकीपूर्वी विधानसभेची उमदेवारी देण्याचे आश्वासन देत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी भाजपमध्ये प्रवेश करून घेतले होते. अशी चर्चा आहे. मात्र युतीत ही जागा शिवसेनेकडे आहे. असे असतानाही भाजपचे दत्ता गोर्डेंनी निवडणूक लढवणाराच अशी भूमिका घेतली असल्याने आमदार भूमरेंची अडचण वाढली आहे. विशेष म्हणजे गोर्डेंनी तालुक्यातील जातीय समीकरणे, मतदारांची आकडेवारी यांची जुळवाजुळवी सुरु केली आहे.
पैठण मतदारसंघातील जातीय समीकरणे पाहिले तर, मराठा समाजाचे मते निर्णायक ठरतात. गोर्डेंनी यावर भर देत नातेगोते आणि समाजातील लोकांच्या भेटींवर भर दिला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे इच्छुक उमदेवार व माजी आमदार संजय वाघचौरे यांचा आव्हान सुद्धा भूमरेना नेहमीप्रमाणे राहणार आहे. तर भुमरे यांचा सुद्धा तालुक्यात मोठा जनसंपर्क आहे. त्यात पंचायत समिती आणि ९ पैकी ७ जिल्हा परिषद जागा ह्या सेनेच्या ताब्यात आहेत.
दत्ता गोर्डे हे कधीकाळी आमदार भुमरे यांचे निकटवर्तीयही समजले जायचे. मात्र लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत शिवसेना सोडलेल्या गोर्डे यांना दानवेंनी भाजपमध्ये घेतले. मात्र आता तेच गोर्डे युतीच्या उमदेवार विरोधात उभे राहण्याच्या तयारीत असल्याने दानवे काय निर्णय घेणार हे महत्वाचे ठरेल.