मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 19 दिवस झाले असताना सुद्धा अजूनही सरकार स्थापन होऊ शकले नाहीत. सर्वच पक्षांनी नवनिर्वाचित आमदारांना सुरक्षित वेगवगेळ्या ठिकाणी राहण्याची सोय केली आहे. त्यामुळे राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकरी अडचणीत असताना सुद्धा, नवनिर्वाचित आमदार गेल्या दोन आठवड्यापासून मतदारसंघात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ मदतीची गरज आहे. असे असताना सुद्धा प्रशासकीय अधिकारी याबाबतीत गंभीर नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम आमदार करताना याआधी अनेकदा पाहायला मिळाले आहे.
राज्यात सत्तास्थापनेवरून सुरु असलेल्या राजकीय घडामोडी लक्षात घेता, शिवसनेने आपले आमदार गेल्या दोन आठवड्यापासून मुंबईतील एका हॉटेलमध्ये ठेवली आहे. तर काँग्रेसने आपली नवनिर्वाचित आमदार जयपूरला पाठवली आहे. त्यात भाजपच्या आमदारांसुद्धा मुंबई न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यात राष्ट्रवादीचे आमदार सुद्धा मुंबईतच ठाण मांडून बसले आहेत.
मतदारसंघातील समस्या घेऊन नागरिक लोकप्रतिनिधीकडे जात असतात. मात्र बहुतेक आमदार हे सद्या मतदारसंघात नसल्याने आपल्या अडचणी कुणाला सांगाव्यात असा प्रश्न लोकांना पडत आहे. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे, पिक विमा अशा अनेक समस्या असताना लोकप्रतिनिधी मात्र सत्तास्थापनेत व्यस्त असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे.