जळगाव - मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. मुक्ताईनगरमधून त्यांना महायुतीची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मुक्ताईनगर येथे आयोजित केलेल्या महायुतीच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, चंद्रकांत पाटील हा बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावान शिवसैनिक आहे. एक कडवट शिवसैनिक आहे. गेल्या दोन वर्षात त्यांच्या या मतदारसंघातील विविध कामांसाठी पाच हजार कोटींचा निधी दिला आहे. हा देणारा मुख्यमंत्री आहे हा महायुतीच्या प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात हा दोन्ही हातांनी देण्याचे काम करत आला असल्याचे स्पष्ट केले. मी जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची संकल्पना मांडली तेव्हा अनेकांना ती फक्त निवडणूकीची घोषणा वाटली,चुनावी जुमला वाटली पैसे येणार नाहीत असे वाटले मात्र हा एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणारा आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे एका महिन्याच्या आत महिलांच्या खात्यात जमा करायला सुरुवात केली. त्यामुळे विरोधक चक्रावले, 'बुरी नजर वाले तेरा मूह काला' अशी त्यांची अवस्था झाली असा टोला त्यांनी लगावला.
तसेच सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना दीड हजारांची किंमत कळणार नाही मात्र या एकनाथ शिंदेला सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस मात्र आणायचे आहेत. राज्यातील लाडक्या बहिणीच लाडक्या भावांना येत्या २० नोव्हेंबरला नक्की काय करायचे ते सांगतील. दिवाळी जवळ आलेली आहे आणि आताच विरोधकांच्या बुडाखाली फटाके फुटू लागले आहेत. २३ तारखेला महायुतीच्या विजयाचा जो धमाका होईल तो आयटम बॉम्ब असेल, याच दिवशी चंद्रकांत पाटील यांच्या विजयाचे फटाके या मुक्ताईनगर मध्ये फुटल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.
दरम्यान, आतापर्यंतच्या इतिहासात एवढ्या योजना कधीही कुणी सुरू केल्या आणि राबवल्या नाहीत तेवढ्या गेल्या दोन वर्षात महायुती सरकारने यशस्वीपणे राबावल्या आहेत. आपण मुख्यमंत्री म्हणजे सीएम म्हणजे 'कॉमन मॅन' आहे मात्र मला जनतेला 'सुपर मॅन' करायचे असल्याचे शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.