मुंबई - राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे दुसरे उमेदवार पराभूत झाल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी काही अपक्ष आमदारांनी भाजपाच्या उमेदवाराला मतदान केल्याचा आरोप केला होता. त्यात त्यांनी देवेंद्र भुयार यांचंही नाव घेतलं होतं. त्यामुळे देवेंद्र भुयार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. तसेच आता देवेंद्र भुयार यांनी शरद पवार यांची भेट घेत आपली बाजू मांडली आहे. तसेच या भेटीनंतर भुयार यांनी सूचक विधानही केलं आहे.
पवार साहेबांसमोरच मी माझे प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. त्यामुळे काही लोकांना मी शिवसेनेच्या विरोधात आहे, असं वाटलं. त्यातूनच शिवसेनेचा पराभव झाल्यानंतर त्याचं खापर अपक्ष आमदारांवर पर्यायाने माझ्यावर फोडलं गेलं. त्यामुळे मी हा मुद्दा शरद पवार यांच्यासमोर मांडलं. त्यानंतर राऊत यांनी गैरसमजामधून हे विधान केलं असावं, असं शरद पवार यांनी सांगितलं.
भुयार म्हणाले राऊत यांनी जेव्हा हे आरोप केलं तेव्हा मला धक्का बसला. मी मतदारसंघातून तातडीने मुंबईत आलो. त्यानंतर मी याविषयावर बोलण्यासाठी वेळ मागितली. जाणीवपूर्वक राजकीयदृष्ट्या टार्गेट करणे, नेत्यांच्या नजरेत खाली पाडणे, मतदारसंघातल्या लोकांच्या नजरेत खाली पाडणे, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. आता मी पवारांसोबत मुख्यमंत्र्यांकडेही वेळ मागितली आहे. निधी नाही दिला तरी वेळ द्या, असं मी सांगितलं. तसेच संजय राऊतांकडेही वेळ मागितलं आहे, असेही भुयार यांनी सांगितलं.
गैरसमजुतीतून हा प्रकार घडला असं शरद पवार यांचं मत आहे. माझंही तसंच मत आहे. त्यामुळे त्याचा योग्य तपास आणि बारकाईनं चौकशी झाली पाहिजे. लगेच प्रतिक्रिया देऊ नये असं मला वाटतं, असे भुयार यांनी सांगितले.
मी साहेबांना सांगितलं की लोकसभेपासून मी राष्ट्रवादी सोबत आहे. जेव्हा शिवसेना महाविकास आघाडीसोबत नव्हती तेव्हापासून मी पवारसाहेबांसोबत आहे. जेव्हा शिवसेना महाविकास आघाडीत नव्हती तेव्हापासून मी महाविकास आघाडीसोबत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर किमान समान कार्यक्रम ठरला तेव्हा शिवसेना आणि संजय राऊत महाविकास आघाडीत आले. त्यापूर्वीपासून मी महाविकास आघाडीत आहे. त्यामुळे माझ्यावर शंका कुशंका घेतली जाता कामा नये होती. तरीसुद्धा असा प्रकार घडला याची प्रचंड खंत आणि वेदना माझ्या मनात आहे, अशा शब्दात भुयार यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
आता विधान परिषदेची निवडणूक आहे, राष्ट्रपती पदाची निवडणूक आहे. विधानसभा अध्यक्षांचीही निवड आहे, त्यावेळी मात्र आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असं मी शरद पवार यांना सांगितलं. तेव्हा शरद पवार म्हणाले की, तुझ्याबाबत अजिबात शंका नाही. पहिल्या दिवसापासून तू आमच्यासोबत आहे. त्यामुळे कुणीही तुझ्यावर शंका घेणार नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं, अशी माहिती देवेंद्र भुयार यांनी दिली.