MLA Devendra Bhuyar ( Marathi News ) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या भाषणात त्यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. हा व्हिडीओ अमराती येथील एका जाहीर सभेतील आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
जाहीर सभेत बोलताना आमदार देवेंद्र भुयार म्हणाले की, पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगा नोकरीवाला पाहिजे. पोरगी जर स्मार्ट हवी असेल तर ती तुमच्या माझ्यासारख्या पोरांना भेटत नाही. नोकरीवाल्यांना भेटते. दोन नंबरची पोरगी कोणाला भेटते ज्यांचा पान ठेला आहे, धंदा, किराणा दुकान आहे , अशा माणसांना दोन नंबरची पोरगी भेटते आणि तीन नंबरचा गाळ, राहिलेली पोरगी शेतकऱ्यांच्या पोरांना भेटते, शेतकऱ्यांच्या पोरांचं काही खरं राहिलं नाही, असं विधान भुयार यांनी केले आहे.
आमदार देवेंद्र भुयार यांच्या या विधानावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. एका बाजूला महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. तर दुसरीकडे आमदारांच्या विधानामुळे आता टीका सुरू आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यावरुन टीका केली आहे. अंधारे म्हणाल्या, भुयार यांचे हे वक्तव्य कृषी क्षेत्रासाठी काम करणाऱ्या भूमीपुत्रांची टिंगल टवाळी करणारा प्रकार आहे.लोकांची अवहेलना करणे आहे. अजित पवार गटाचे किंवा शिंदे गटाचे लोक असतील यांना एक खात्री पटली आहे की आपण काहीही केले तरीही आपल्यावर कारवाई होणार नाही, या मस्तवालपणापासून अशी वाक्य येतात. शेतकरी आणि महिलांची टींगल करणे हाच तुमचा अजेंडा आहे का?, असा सवालही ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला.