आमदार अपात्रता; ३४ याचिका एकत्र, सहा गट करून होणार सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 06:44 AM2023-10-21T06:44:49+5:302023-10-21T06:45:43+5:30
शिवसेनेच्या ५६ आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांसमोर शुक्रवारी सुनावणी झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणातील ३४ याचिका वेगवेगळ्या गटामध्ये एकत्रित करण्याचा निर्णय घेतला असून, त्यांचे सहा गट करून सुनावणी घेतली जाणार आहे. आता पुढील सुनावणी २६ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
शिवसेनेच्या ५६ आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांसमोर शुक्रवारी सुनावणी झाली. या सुनावणीत ३४ वेगवेगळ्या याचिका सहा गटांमध्ये एकत्र करण्यात आल्या आहेत. एकत्र सुनावणी व्हावी अशी ठाकरे गटाची मागणी होती.
नार्वेकरांनी व्यक्त केली नाराजी
दरवेळेस वेगवेगळ्या याचिका अर्ज दाखल केल्या जातात. त्यात वेळ घालवला जातो. येथे एक भूमिका आणि सर्वोच्च न्यायालयात वेगळी भूमिका का घेता, असा सवाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणीवेळी ठाकरे गटाला केला. मी सुनावणी घेत आहे. तर सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली कागदपत्रे माझ्यासमोर सादर करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.