Mla Disqualification Hearing: महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून, आमदार अपात्रतेप्रकरणी अधिवेशन काळातही सुनावणी नियमितपणे सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, ३१ डिसेंबरपर्यंत आमदार अपात्रतेप्रकरणी निकाल द्यायचा आहे. आमदार अपात्रतेप्रकरणाची सुनावणी जवळपास वेळेत पूर्ण होऊ शकते. मात्र, निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. निकालासाठी वेळ वाढवून द्यावा, अशी विनंती विधिमंडळाकडून सर्वोच्च न्यायालयाला केली जाऊ शकते, असे सांगितले जात आहे.
आमदार अपात्रतेप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांची उलट तपासणी सुरू असून, साक्षी नोंदवण्याचे काम केले जात आहे. २० डिसेंबरपर्यंत दोन्ही बाजूच्या साक्षी नोंदवणे आणि उलट तपासणीचे काम पूर्ण होऊ शकते, असे म्हटले जात आहे. मात्र, असे असले तरी ३१ डिसेंबरपर्यंत निकाल लावण्यात अनेक अडथळे असल्याचे सांगितले जात आहे.
सुनावणी वेळेत पूर्ण, पण मग निकाल लांबणीवर?
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात २ लाख पानांचे दस्तावेज तयार करण्यात आले आहेत. ३४ याचिकांचे सहा गटांत वर्गीकरण केल्यामुळे विविध ६ निकाल लागणार आहे. विधीमंडळ सचिवालयाकडून सुनावणी कार्यवाही २० डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र २१ ते ३१ डिसेंबर कालावधीत निकालाचे लेखन अशक्य असल्याचे समोर येत आहे. याशिवाय नागपूरहून मुंबईत कागदपत्रे नेण्यासाठी वेळ लागणार आहे. परिणामी, सहा याचिकांचे निकाल लावण्यासाठी अधिक वेळेची मागणी करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने अधिकचा ३ आठवड्यांचा वेळ मागितला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ओव्हरटाईम करत सुनावणी घेत आहेत. मात्र, सदर परिस्थितींमुळे आमदार अपात्रता प्रकरणी निकाल येण्यास विलंब होऊ शकतो, असा कयास बांधला जात आहे.