आमदार अपात्रता प्रकरणी आजपासून पुन्हा सुनावणी; विधानसभाध्यक्ष काय निर्णय देणार? याकडे दोन्ही गटांचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 09:11 AM2023-11-21T09:11:15+5:302023-11-21T09:16:18+5:30
विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी २ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत व्हीपबाबत दोन्हीकडच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ऐकून घेत निर्णय राखून ठेवला.
मुंबई : आमदार अपात्रतेवरील पुढील सुनावणी मंगळवारपासून विधानसभाध्यक्षराहुल नार्वेकर यांच्यासमोर विधिमंडळात सुरू होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व्हीप मिळाला नसल्याचा शिंदे गटाचा दावा आणि ठाकरे गटाने पुरावे सादर करण्यासाठी मागितलेली परवानगी, यावर विधानसभाध्यक्ष काय निर्णय देतात, याकडे दोन्ही गटांचे लक्ष आहे.
विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी २ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत व्हीपबाबत दोन्हीकडच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ऐकून घेत निर्णय राखून ठेवला. तसेच ३१ डिसेंबरपर्यंत मला निर्णय द्यायचा आहे, असेही स्पष्ट केले होते."मला लवकरात लवकर सुनावणी घ्यायची आहे. तुम्ही सर्व याचिका दाखल करुन वेळ का वाढवत आहात. १६ नोव्हेंबरपर्यंत ठाकरे आणि शिंदे गटाने यासंबंधी सर्व कागदपत्रं जमा करावीत. मला ३१ डिसेंबरच्या आधी या प्रकरणावर सुनावणी घ्यायची आहे", असे राहुल नार्वेकर म्हणाले होते. त्यामुळे ही सुनावणी २५ डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ३१ डिसेंबरपर्यंत आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलेला आहे. त्यामुळे राहुल नार्वेकरांनी लवकरात लवकर सुनावणी पार पडावी, यादृष्टीने प्रयत्न सुरु केला आहे. आजपासून पुढील सुनावणी राहुल नार्वेकर यांच्यासमोर विधिमंडळात सुरू होणार आहे.