"तुम्ही जिंकलात म्हणजे आम्ही हरलो असं होत नाही", सुषमा अंधारेंचा शिंदे गटाला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 08:08 PM2024-01-10T20:08:52+5:302024-01-10T20:09:27+5:30
एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना, असा निकाल राहुल नार्वेकरांनी दिला आहे.
MLA Disqualification Case Sushma Andhare : राज्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाचे वाचन केले. यावेळी एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल नार्वेकरांनी दिला आहे. तसेत भरत गोगावले हेच मुख्य प्रतोद असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आजच्या निकालानंतर शिवसेना(उबाठा) गटाच्या नेत्या सुष्मा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाचा आज अखेर निकाल लागला. अवघ्या राज्याचे लक्ष या निकालाकडे होते. आजच्या निकालात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे, तर एकनाथ शिंदेंसह सर्व बंडखोर आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता या निकालांनंतर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आजच्या निकालानंतर शिवसेना नेत्या सुष्मा अंधारे (Sushma Andhare) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर प्रतिक्रिया दिली. सुषमा अंधारे म्हणाल्या की, "तुम्ही जिंकलात म्हणजे आम्ही हरलो असं होत नाही, डाव तुमच्या हातात दिला तरी जिंकता तुम्हाला येत नाही" , असा टोला त्यांनी आपल्या पोस्टमधून लगावला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी भाजप, राहुल नार्वेकर, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना टॅग केले आहे.
"तुम्ही जिंकलात म्हणजे
— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) January 10, 2024
आम्ही हरलो असं होत नाही
डाव तुमच्या हातात दिला तरी
जिंकता तुम्हाला येत नाही " @BJP4India@rahulnarwekar@mieknathshinde@ShivsenaUBTComm@OfficeofUT
ठाकरेंना कोर्टात जावं लागेल - शरद पवार
सत्ताधाऱ्यांनी निकालाबाबत आधीच भाष्य केले होते, त्यानुसारच हा निर्णय आला आहे. अध्यक्षांनी विधिमंडळ पक्षाला महत्त्व दिल्याचे दिसून आले. त्यामुळे, आता पुन्हा एकदा ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल. व्हीप बजावण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळ पक्षाला महत्त्व दिले. तर, व्हीप देण्याबाबात पक्ष संघटना महत्त्वाची, असे कोर्टाने म्हटले होते. त्यामुळे, येथे सर्वोच्च न्यायालयाचे मार्गदर्शक तत्वे डावलण्यात आली आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी दिली
आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार- उद्धव ठाकरे
आजच्या निकालानंतर उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे म्हटले आहे. शिवसेना शिंदेंची होऊच शकत नाही. शिवसेना कोणाची हे ठरवेणारे नार्वेकर कोण? नार्वेकरांकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झालाय. नार्वेकर कोर्टालाही जुमानत नाहीत, हे या निकालावरुन सिद्ध झाले. त्यामुळे, त्यांच्याविरुद्ध अवमानयाचिका दाखल करता येते का, ते आम्ही पाहणार आहोत. आम्ही पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.