विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू असलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीकडे राज्यातील संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, आज सुनावणीला पुन्हा सुरुवात झाल्यावर ठाकरे गटाकडून आमदार अपात्रता आणि पक्षफुटीबाबत आणखी पुरावे सादर करण्यात आले आहे. सुनावणीवेळी ठाकरे गटाच्या वकिलांनी पक्षाने पाठवलेल्या नोटिसा आणि वृत्तपत्रातील कात्रणे सादर केली आहेत.
आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोर आजपासून पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात झाली आहे. या सुनावणी वेळी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. या सुनावणीला ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू आणि अनिल देसाई हे उपस्थित आहेत. सुनावणीदरम्यान, ठाकरे गटाकडून पक्षफुटीबाबतचे पुरावे सादर करण्यात आले आहेत. पक्षाने पाठवलेल्या नोटिसा आणि वृत्तपत्रातील कात्रणे सादर केली आहेत.
ठाकरे गटाने नव्याने पुरावे सादर करण्यासाठी वेळ मागून घेतली होती. दरम्यान, आमदारांच्या अपात्रता सुनावणीमधील आक्षेप आणि युक्तिवाद यांचं व्हिडीओ चित्रिकरण करा, अशी मागणी ठाकरे गटाच्या वकिलांनी केली होती. मात्र ही मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावली आहे. तसेच सर्व युक्तिवाद आणि आक्षेप हे आमच्याकडून रेकॉर्डवर घेतले जात आहेत, असं नार्वेकर यांनी सांगितले आहे.
आमदार अपात्रता प्रकरणी ३१ डिसेंबरपर्यंत सुनावणी घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहेत. त्या कारणाने राहुल नार्वेकरांनी लवकरात लवकर सुनावणी पार पडावी, यादृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत.