‘राहुल नार्वेकरांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला’, आजच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 08:29 PM2024-01-10T20:29:24+5:302024-01-10T20:29:47+5:30
'दोन-तीन पक्ष बदलणाऱ्या नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचे नियमही धाब्यावर बसवले.'
MLA Disqualification Case Uddhav Thackeray: राज्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बाजूने दिला. तसेच, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, हीच खरी शिवसेना असल्याचे नार्वेकरांनी सांगितले. या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत हल्लाबोल केला.
नार्वेकरांनी निर्लज्जपणाचा...
'निवडणूक आयोगाचा चुकीचा निकाल, ज्याला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान दिले, तो निर्णय यांनी ग्राह्य धरला. म्हणजे निर्णय देताना पायच चुकला. राहुल नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केला, त्याबद्दल अवमान याचिका दाखल करता येते का ते आम्ही बघणार आहोत. राहुल नार्वेकरांनी आज निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे,' अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
संबंधित बातमी- "तुम्ही जिंकलात म्हणजे आम्ही हरलो असं होत नाही", सुषमा अंधारेंचा शिंदे गटाला टोला
ते पुढे म्हणतात, 'ज्या पद्धतीने राहुल नार्वेकरांना बसवलं, त्यातून त्यांची मिलिभगत किंवा संगनमत झाल्याचे स्पष्ट होते. त्यांनी जावून आरोपीची दोनवेळा भेट घेतली. मात्र आजच्या निकालामुळे एक गोष्ट आणखी प्रश्नांकीत झाली आहे की, लोकशाहीची त्यांनी हत्या केली आहेच, पण पक्षांतर बंदी कायदा अधिक मजबूत करण्याऐवजी पक्षांतर कसे करावे अथवा पक्षांतराचा राजमार्ग कसा असायला पाहिजे, हे निकालातून दाखवून दिले आहे.
सुप्रीम कोर्टाचे नियम धाब्यावर बसवले
'स्वत: विधानसभा अध्यक्षांनी दोन-तीन पक्ष बदलले आहेत, त्यामुळे त्यांच्या भावी वाटचालीतला अडथळा दूर करुन घेतला असेल. आजपर्यंत आपण मानत आलो की, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश सर्वोच्च असतात. पण नार्वेकरांनी जो काही निकाल दिला, सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत ते स्पष्टपणे धाब्यावर बसवले, पायदडी तुडवले आणि जणू काही आमच्या मागे महाशक्ती आहे, आम्ही सर्वोच्च न्यायालयातही जुमानत नाहीत, हे त्यांच्या आजच्या निकालातून स्पष्ट दिसून आले', असा हल्लाबोलही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.
आम्ही पुन्हा कोर्टात जाणार
ठाकरे पुढे म्हणतात, "महत्त्वाचे म्हणजे, मूळ प्रकरण हे अपात्रतेचं होते, पण त्यांनी कुणालाच अपात्र केले नाही. आमची घटना दुरुस्ती तुम्ही ग्राह्य धरत नसाल तर मग तुम्ही आम्हाला अपात्र का नाही केलं? त्याही पलिकडे जावून त्यांनी निकाल दिला की शिवसेना कुणाची? शिवसेना कुणाची याचे उत्तर महाराष्ट्रातील लहान मुलेही देतील. शिवसेना शिंदेंची होऊच शकत नाही. शिवसेना कोणाची हे ठरवेणारे नार्वेकर कोण? नार्वेकरांकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झालाय. आम्ही पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.