राज्यात जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागलीय तसतशी राजकीय घडामोडी वाढण्यास सुरुवात झाली आहे. विरोधक शिवसेना, राष्ट्रवादीच्या भाजपासोबत गेलेल्या आमदारांच्या अपात्रतेकडे डोळे लावून बसले आहेत. तर सत्तेत असलेले आणखी काही दिवस कसे मिळतील याचे मार्ग शोधत आहेत. अशातच विधनसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मुद्दामहून निर्णय घेण्यास उशिर करत असल्याचा आरोप करत ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. यावरही एकत्र सुनवाणी घेण्यात येणार आहे.
अशातच राहुल नार्वेकर यांनी आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणी १३ तारखेला होणार होती, ती आता १२ तारखेला घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. १३ तारखेलाच सर्वोच्च न्यायालयात देखील ठाकरे आणि शरद पवार गटाच्या याचिकांवर सुनावणी घेतली जाणार आहे. परंतू, दिल्लीतील P20 च्या नियोजित कार्यक्रमामुळे विधानसभेतील सुनावणी १२ तारखेला घेणार असल्याचे कारण नार्वेकर यांनी दिले आहे.
याचबरोबर मी या विषयात दिरंगाई नाही तर लवकर सुनावणी घेत आहे, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले. यामुळे सुनावणी लवकर करायची आहे की विलंब करायचाय याबद्दल प्रत्येकाने विचार करावा, असेही नार्वेकरांनी विरोधकांना म्हटले आहे.
मच्छीमार नगरच्या सुशोभिकरणाचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे. मुंबईतील आदर्श कोळीवाडा म्हणून बघण्याची संधी आम्ही उपलब्ध करुन देणार आहोत. त्या दिवशी मी येथील कामाची पाहणी करुन कामाविषयी कानउघडणी कऱण्याची गरज होती, ती मी केली. समाधानकारक काम येथे हाती घेतलं गेलं आहे. मला खात्री आहे की पुढच्या दोन महिन्याच्या आत हे संपूर्ण काम पूर्ण होईल. सुशोभित कोळीवाडा मुंबईकरांसाठी उपलब्ध करुन देऊ, असे नार्वेकर म्हणाले.