आमदार अपात्रता सुनावणी लांबणीवर?; विधानसभा अध्यक्ष सुप्रीम कोर्टाकडे वेळ मागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 06:22 AM2023-12-08T06:22:26+5:302023-12-08T06:22:57+5:30
नागपूर येथील सुयोग या पत्रकारांच्या अधिवेशनकालीन निवासस्थानी अनौपचारिक संवादावेळी विधानसभा अध्यक्षानी सुनावणी विषयी माहिती दिली.
मनाेज माेघे
नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाबरोबर आमदार अपात्रता सुनावणीलाही सुरुवात झाली आहे. यासाठी आपल्याला विधानसभा आणि सुनावणी असे बारा बारा तास काम करावे लागणार आहे. शनिवार-रविवारीही सुनावणी घेणार असून दोन्ही पक्षकाराकडून सहकार्य झाल्यास वेळेत सुनावणी पूर्ण करता येईल. मात्र अजूनही अर्ज दाखल केले जात असून सुनावणीसाठी अधिक वेळ लागल्यास आणि 31 डिसेंबर आधी सुनावणी पूर्ण करणे शक्य न झाल्यास सर्वोच्च न्यायालयाकडे वेळ मागितला जाईल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
नागपूर येथील सुयोग या पत्रकारांच्या अधिवेशनकालीन निवासस्थानी अनौपचारिक संवादावेळी विधानसभा अध्यक्षानी सुनावणी विषयी माहिती दिली. न्याय संस्था आणि विधिमंडळ या दोन्ही संस्था आपापल्या कार्यकक्षेत राहून काम करीत आहेत. यात अंतिम शब्द कोणाचा असेल असे होत नाही. त्यामुळे न्यायालयाने 31 डिसेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण करून निर्णय देण्यास सांगितले आहे त्यानुसार वेगाने सुनावणी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. मात्र तरीही अधिक वेळ लागण्याची शक्यता निर्माण झाल्यास न्यायालयाला कळवले जाईल.
राष्ट्रवादीची सुनावणीही लवकरच
आमदार अपात्रता सुनावणीसाठी ट्रिपल ओव्हर टाइम करू. राष्ट्रवादी बाबत ज्या याचिका दाखल झाल्या आहेत. त्याची उत्तरे आली आहेत. लवकरच याबाबत सुनावणी सुरू करू, असं नार्वेकर म्हणाले.
... म्हणून राष्ट्रवादीला एकच कार्यालय
राष्ट्रवादीच्या कार्यालयावर नार्वेकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी एक विधिमंडळ कार्यालय दिले आहे. राष्ट्रवादीत दोन गट आहेत, अशी माहिती माझ्यापर्यंत आलेली नाही. तसे कोणतेही निवेदन देण्यात आलेले नाही. त्यामुळे हे कार्यालय एकत्र आहे. आम्हाला वेगळा गट ठरवावा, असे माझ्याकडे निवेदन आलेले नाही. तसं निवेदन आले तर बघू, असं म्हणालेत.
राष्ट्रवादीच्या विधानपरिषद आमदारांनाही नोटीस
ठाकरे गटाने डॉ. गोऱ्हे, मनीषा कायंदे व विप्लव बजोरिया यांना अपात्र ठरविण्यासाठी याचिका सादर केल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सतीश चव्हाण, अमोल मिटकरी, विक्रम काळे, अनिकेत तटकरे आणि जितेंद्र आव्हाड यांनी रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या विरोधात याचिका सादर केल्या आहेत. या दोन्ही याचिकानबाबत बोलताना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी. शिवसेना ठाकरे गटाच्या याचिकेत माझे नाव असल्याने ही सुनावणी मी घेणार नाही. त्यामुळे कधी होणार हे सांगू शकत नाही. मात्र अपात्रतेसंदर्भात राष्ट्रवादीच्या आमदारांना गुरुवारी म्हणजे आजच नोटीस पाठवण्यात येईल, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.