लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्याच्या राजकारणात उलथापालथ घडवणाऱ्या शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल अखेर उद्या बुधवारी लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हा निकाल देणार आहेत. शिवसेना ठाकरे गट की शिंदे गट यातील कोणाचे आमदार अपात्र ठरणार, की काही वेगळा निकाल लागणार याची उत्सुकता आहे.
निकाल लागण्याच्या पूर्वसंध्येला राज्यातील राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. विधिमंडळ सचिवालयाकडून निकालाची प्रत अंतिम करण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी रात्री तातडीची बैठक बोलावण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याच्या नव्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला या वर्षा निवासस्थानी दाखल झाले. निकाल असल्याने मुंबईसह राज्यभरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.
सहा भागांत निकाल
३४ याचिकांची सहा गटात विभागणी करण्यात आली असून त्यानुसार निकालाचे वाचन होईल.
- सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेची केलेली मागणी
- सुनील प्रभू यांनी तीन अपक्ष आमदारांच्या अपात्रतेसाठी केलेल्या याचिका
- सुनील प्रभू यांनी योगेश कदम यांच्यासह शिंदे गटातील १८ आमदारांच्या अपात्रतेसाठी केलेल्या याचिका
- सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्ष निवडीच्या व्हिपचा भंग केल्याबद्दल एकनाथ शिंदेंसह ३९ आमदारांच्या अपात्रतेची याचिका
- सुनील प्रभू यांनी विश्वासदर्शक ठरावाबाबतच्या व्हिपचा भंग केल्याबद्दल एकनाथ शिंदेंसह ३९ आमदारांच्या अपात्रतेसाठी केलेल्या याचिका
- व्हिपचे उल्लंघन केल्याबद्दल ठाकरे गटाच्या १४ आमदारांच्या अपात्रतेची मागणी करणारी भरत गोगावले यांची याचिका
आज चार वाजता निकालाचे वाचन
सायंकाळी चार वाजता विधानसभा अध्यक्ष विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात निकालाचे वाचन करणार आहेत. ५०० पानांच्या निकालपत्रातून महत्त्वाचे मुद्दे घेऊन एक सारांश निकाल ते वाचून दाखवतील. हा साधारण ५-१० पानांचा सारांश निकाल असेल. त्यानंतर निकालाची मूळ प्रत दोन्ही गटाच्या वकिलांना दिली जाईल.
निर्णय कायद्याला धरूनच : नार्वेकर
मुख्यमंत्री यांना अध्यक्ष कोणत्या कामासाठी भेटू शकतात याची कल्पना माजी मुख्यमंत्री ठाकरे यांना असायला हवी. आमदार म्हणून माझ्या मतदारसंघाची कामे असतात. मुख्यमंत्र्यांच्यासोबत माझी बैठक ३ तारखेला नियोजित होती, पण आजारी असल्याने मी भेटू शकलो नाही. आज सकाळी मुंबई विमानतळावर अनिल देसाई आणि जयंत पाटील यांना भेटलो. ती काय राजकीय भेट होती का? असा सवाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केला. आमदार अपात्रता प्रकरणात कुठेही कायद्याच्या तरतुदींची मोडतोड झालेली नसून माझा निर्णय कायद्याला धरूनच असणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
निकालापूर्वी मुख्यमंत्री व नार्वेकर भेट; ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात
- आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय देण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निःपक्षपणावर प्रश्नचिन्ह लावत उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
- नार्वेकर यांनी ७ जानेवारी रोजी मुख्यमंत्री शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली याकडे सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उबाठा) वतीने आमदार सुनील प्रभू यांनी आज ही याचिका दाखल केली.
- प्रभू यांनी दाखल केलेल्या याचिकेमुळेच अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी उचित कालमर्यादेत निकाल द्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.
लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. पहिल्या दिवसापासून बहुमत आमच्याकडे आहे. निवडणूक आयोगानेही अधिकृत शिवसेना पक्ष व चिन्ह आम्हाला दिले आहे. मला खात्री आहे की मेरिटप्रमाणे निकाल लागेल.-एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
आम्ही कायदेशीर सरकार तयार केले आहे. अध्यक्षांच्या निकालानंतर आम्हाला शंभर टक्के न्याय मिळणार आहे. महायुतीचे सरकार स्थिर असून सरकार कालही स्थिर होते आणि उद्याही स्थिर राहील.-देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
निकालाच्या आधीच नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, ही बाब अत्यंत आक्षेपार्ह असून, एकप्रकारे न्यायाधीशांनी आरोपींना निकालापूर्वी भेटण्याचा हा प्रकार आहे. अशा वेळी निष्पक्ष निकालाची अपेक्षा नार्वेकर यांच्याकडून कशी करायची?- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट)
ज्यांच्यापुढे केस आहे आणि ज्यांची केस आहे, ते जाऊन भेटतात इथेच संशय निर्माण होतो आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आपली प्रतिमा जपली पाहिजे.- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस