महाराष्ट्रातल्या पोलीस भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शासनाकडून पोलीस भरतीचा जीआर काढण्यात आला आहे. शासनाच्या या जीआरमुळे तब्बल ११ हजार ४४३ पदं भरली जाणार आहेत. महाराष्ट्र पोलिसांची रिक्त असलेली १०० टक्के पदं भरण्याला मान्यता देण्यात आली आहे. पण, या भरतीत नॉन क्रिमिलेअर सर्टीफिकेट सादर करण्यासंदर्भात काही अटी घालण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे नूकसान होणार आहे, यावर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या अटी शीथिल करण्याची मागणी केली आहे.
राज्यातील पोलीस खात्यामध्ये पोलीस शिपाई संवर्गामध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई अशी एकूण ११ हजार ४४३ पदं भरली जाणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी कक्षेतील पदं वगळता अन्य पदं ५० टक्के भरण्यास राज्य शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
या पोलीस भरती प्रक्रीयेत इतर मागास, भटक्या विमुक्त जमाती, जाती व विशेष मागास प्रवर्गातील उत्तीर्ण उमेदवारांना दि. १ एप्रील २०२१ ते ३१ मार्च २०२२ या वित्तीय वर्षातील नॉन क्रिमिलेअर सर्टीफिकेट सादर करण्याची अट घालण्यात आली आहे. या अटीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते असं बोलले जात आहे. यामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्र लिहून अटी शिथिल करण्याची मागणी केली आहे.
काय म्हटलंय पत्रात
महाराष्ट्रात परत एकदा बहुजन हिताचा विचार व व्यवहार करणारे युती सरकार आल्यामुळे राज्यात उत्साहाचं वातावरण आहे. अनेक धडाडीचे निर्णय घेतले जात आहेत. महाराष्ट्रातील तरूणांचा विचार करता आपल्या मार्गदर्शनाखाली गृह विभागामार्फत मेगा पोलिस भरती होत आहे. त्याचे स्वागत सर्वच स्तरातून झाले.
सदरील पोलीस भरती प्रक्रीयेत इतर मागास, भटक्या विमुक्त जमाती, जाती व विशेष मागास प्रवर्गातील उत्तीर्ण उमेदवारांना दि. १ एप्रील २०२१ ते ३१ मार्च २०२२ या वित्तीय वर्षातील नॉन क्रिमिलेअर सर्टीफिकेट सादर करण्याची अट आहे. या अटीतील तारखेमुळे विद्यार्थ्यांमधे एक संभ्रम निर्माण झाला आहे. तांत्रिकदृष्ट्या विशिष्ट तारखेतीलच सर्टीफिकेट सादर करणे हे उमेदवारांना अशक्य आहे. यामुळे हजारो बहुजन विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे आपल्यासारख्या संवेदनशील व्यक्तीने या बाबीकडे लक्ष देऊन तारखेच्या अटीची शिथिलता करावी व बहुजन विद्यार्थ्यांना आश्वस्थ करावे, ही विनंती.