आशिष राणे, लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : विरार येथील आय.सी.आय.सी.आय बॅंकेवरील दरोड्याच्या घटनेत सतर्कता दाखवून आरोपीला पकडून देणाऱ्या व जखमी बँक कर्मचारी महिलेला जीवदान देणाऱ्या त्या धाडसी युवकांचा बविआचे अध्यक्ष तथा आम. हितेंद्र ठाकूर यांच्या तर्फे सन्मान करण्यात आला आहेअशी माहिती बविआ पक्षातर्फे लोकमत ला देण्यात आली आहे.
विरार बँकेवर दरोडा व महिला व्यवस्थापक यांची हत्या करणाऱ्या आरोपींला त्या धाडसी युवकांनी मोठया धाडसाने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल, इतकंच नाही तर बँकेतील त्या जखमी महिला कर्मचारी हिला तात्काळ रुग्णालयात देखील पोचवल्यानं तिचे प्राण वाचले होते. या आणि अशा धाडसाचे कौतुक आता स्वतः बविआ अध्यक्ष तथा आम.हितेंद्र ठाकूर यांनी केलं असून शुक्रवार दि 27 ऑगस्ट रोजी बविआ विरार येथील कार्यालयात या सर्व धाडसी युवकांचा आम हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आम.क्षितीज ठाकूर, माजी महापौर नारायण मानकर, माजी नगरसेवक अजीव पाटील, माजी नगराध्यक्ष मुकेश सावे हे उपस्थित होते.
दि.29 जुलै 2021 रोजी विरार पूर्व येथील आय सी.आय. सी. बँकेवर त्याच बँकेच्या माजी व्यवस्थापक अनिल दुबे याने दरोडा टाकून बँकेच्या सहा.व्यवस्थापक योगीता वर्तक चौधरी यांच्यावर धारदार शस्त्राने वार केल्यानं चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला तर अनिल दुबे बँकेच्या लॉकरमधील ऐवज व रोख रक्कम गोळा करत असताना कार्यालयात ड्युटीवर हजर असलेल्या श्रद्धा देवरूखकर यांनी अलार्म वाजवून नागरिकांना सतर्क ही केले. परंतु त्यावेळी आरोपी दुबे यांनी श्रध्दा देवरूखकर यांच्यावर देखील वार करून त्यांनाही गंभीर जखमी केले.
अलार्म वाजताच सर्व युवक धावले आणि या सर्व युवकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आरोपी अनिल दुबे याला पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले. तसेच योगिता वर्तक चौधरी यांचा आधीच मृत्यू झाला होता परंतु श्रध्दा देवरुखकर हया रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या त्यांना तात्काळ संजीवनी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केल्यानं त्यांचा जीव वाचला.
या धाडसी युवकांचा झाला सत्कार!
त्यामध्ये सर्वश्री अमित मिश्रा, भावेश चौहान, अब्दुल शिकलगार, कुलदिप बारी, शाहरूख खान, शैलेश गोसावी, धनंजय सालीयन, प्रशांत घुलेकर, प्रशांत वास्त, निलेश सिंग, कृनाल चौहान, निशात पिलाने, किसन सिंग, रोहीत बराईत आदींचा समावेश आहे.