Jayant Patil ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला यश मोठं यश मिळाले. तर महायुतीला अपेक्षित जागांवर विजय मिळवता आला आहे. दरम्यान, आता काही महिन्यातच राज्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार असून या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षात इनकमिंग सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे.
जयंत पाटील जालना दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्यात काहीवेळ बंद दाराआड चर्चा झाली, यामुळे आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.
Rain Update : आजही जोरदार कोसळणार!'या' जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाने दिला इशारा
बंद दाराआड चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसमधील विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या पाथरी येथील निवासस्थानी आमदार जयंत पाटील यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. दुर्रानी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत, त्यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ काही दिवसातच संपणार आहे, यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
तर दुसरीकडे काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली होती. यामुळे आमदार बेनके विधानसभेपूर्वी शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
बाबाजानी दुर्रानी काय म्हणाले?
आमदार बाबाजानी दुर्रानी म्हणाले, मी राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष आहे. आम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना आमचे विचार, मैत्री जिव्हाळ्याचे संबंध आहेत. काल जयंत पाटील परभणीला जात असताना आमच्याकडे चहासाठी येणार होते, मी त्यांना जेवणासाठी बोलावले. मी राष्ट्रवादी शरद पवार गटात जाणार अस काही नाही, फक्त मीडियात चर्चा आहेत. इकडे काय आणि तिकडे काय दोन्हीकडे आमचे संबंध चांगले आहेत, असंही आमदार बाबाजनी दुर्रानी म्हणाले. भविष्यात निवडणुकीचा काळ आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात अशा चर्चा सुरू असतात. मी पाथरी विधानसभेतून निवडणूक लढणार आहे, असंही दुर्रानी म्हणाले.