मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजप-शिवसेनेत मोठ्याप्रमाणात इनकमिंग वाढली आहे. त्यातच आता श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला असून, लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र श्रीरामपूर मतदारसंघातून सेनेकडून विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले लहू कानडे यांची कांबळे यांच्या प्रवेशाने डोकेदुखी वाढली आहे.
गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निष्ठावंत समजले जाणाऱ्यांपैकी आमदार कांबळे हे एक. विखे काँग्रेसमध्ये असताना नगर जिल्ह्यातील राजकरणात विखे-थोरात अशी दोन गट कार्यरत होती. त्यापैकी विखे गटाचे कार्यकर्ते म्हणून कांबळे यांची ओळख होती. आता विखे भाजपमध्ये गेल्याने कांबळे यांचे काँग्रेसमध्ये कसे मन लागणार. म्हणून अखेर कांबळे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे कांबळे यांनी राजीनामा देताना उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई व मिलिंद नार्वेकर यांची उपस्थिती असल्याने कांबळे हे सेनेत जाणार असल्याचे निश्चित झाले आहे.
तर श्रीरामपूर मतदारसंघातून सेनेकडून कांबळे यांची उमेदवारी सुद्धा निश्चित असणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र गेल्यावेळी सेनेकडून उमेदवार असलेले आणि आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुक असलेले लहू कानडे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांबळे यांच्या सेनाप्रवेशाने कानडे यांची पंचाईत झाली आहे. त्यातच कांबळे यांनाच उमेदवारी मिळावी म्हणून खुद्द विखे पाटील पुढाकार घेऊ शकतात असेही बोलले जात आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना जिल्ह्यातील राजकरणातच अडकून ठेवण्यासाठी सेना-भाजपकडून प्रयत्न सुरु आहे. त्यातच आता कांबळे यांनी राजीनामा दिल्याने थोरातांच्या अडचणीत पुन्हा एक भर पडली आहे. विशेष म्हणजे नगर जिल्ह्यातील संपूर्ण मतदारसंघातील उमेदवारी ही विखेंच्या सुचनेनुसार दिली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कांबळे यांची उमेदवारी निश्चित समजली जात असून कानडे यांना यावेळी डावलण्यात येणार असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.