मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप-शिवसेनेने फोडाफोडीचे राजकरण सुरु केले आहे. त्यामुळे अनेक काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप सेनेत पक्षांतर करण्याचा धडाका लावला आहे. त्यातच आता सात वेळा आमदार राहिलेले वडाळा मतदारसंघाचे काँग्रेसचे विद्यामान आमदार कालिदास कोळंबकर हे सुद्धा भाजपमध्ये जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. गेल्यावेळी कोळंबकर यांचा अवघ्या ८०० मतांनी विजय झाला होता. त्यामुळे राजकीय वारे लक्षात घेत कोळंबकर यांनी अखेर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.
राज्याच्या राजकरणात कोण- कोणत्या पक्षात जात आहे, हा मुद्दा चर्चेचा बनला आहे. सकाळी सत्ताधाऱ्यांवर टीका करणारे रात्री वर्षा आणि मातोश्रीवर भेटीगाठ घेत असल्याचे पहायला मिळत आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे एकेकाळचे निकटवर्तीय आणि विद्यमान काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर हे भाजपमध्ये जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. मंगळवारी ते कमळ हातात घेणार असल्याचे जवळपास ठरले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मागच्यावेळी कोळंबकर आणि भाजपचे मिहीर कोटेचा यांच्यात अटीतटीचा सामना पाहायला मिळाला होता. कोळंबकर यांचा अवघ्या ८०० मतांनी विजय झाला होता.वडाळा मतदारसंघात कोळंबकर यांची चांगली पकड आहे. मात्र गेल्या पाच वर्षात भाजपची ताकद वाढली असल्याचे सत्य सुद्धा नाकारता येत नाही. त्यातच गेल्यावेळी अवघ्या ८०० मतांनी विजय मिळवणारे कोळंबकर यांचा यावेळी प्रवास खडतर असणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राजकीय घडामोडी लक्षात घेत, कोळंबकर यांनी शेवटी भाजपमध्ये जाण्याचे निश्चित केले असल्याचे बोलले जात आहे.
विधानसभा २०१४
कालिदास कोळंबकर ( काँग्रेस ) - ३८ हजार ५४०
मिहीर कोटेचा ( भाजप ) - ३७ हजार ७४०