आमदार म्हेत्रेंच तळ्यात-मळ्यात; भाजप-काँग्रेस कार्यकर्ते मात्र संभ्रमात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 12:30 PM2019-08-06T12:30:59+5:302019-08-06T12:36:49+5:30
स्थानिक भाजपच्या नेत्यांनी आमदार म्हेत्रे यांना यांना भाजपमध्ये उमेदवारी देऊ नये अन्यथा अक्कलकोट तालुका भाजपमुक्त करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षप्रवेशाचा धडाका पहायला मिळत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक विद्यमान आमदारांनी भाजप-सेनेत प्रवेश केला आहे. अक्कलकोट मतदारसंघाचे काँग्रेसचे विद्यामान आमदार सिद्धाराम म्हेत्रे हे सुद्धा भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध लक्षात घेता, आमदार म्हेत्रेंच तळ्यात-मळ्यात सुरु आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमात आहे.
भाजप-शिवसेनेने फोडाफोडीचे राजकरण करत विधानसभेच्या आधीच विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेण्याचा धडाकाच लावला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट मतदारसंघाचे आमदार म्हेत्रे सुद्धा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. आपण कोणत्या पक्षात राहवे यासाठी त्यांनी कार्यकर्त्याचा मेळावा सुद्धा घेतला होता. मात्र स्थानिक भाजपच्या नेत्यांनी आमदार म्हेत्रे यांना यांना भाजपमध्ये उमेदवारी देऊ नये अन्यथा अक्कलकोट तालुका भाजपमुक्त करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा होणारा विरोध लक्षात घेत, आमदार म्हेत्रे यांची अवस्था तळ्यात-मळ्यात झाली आहे. भाजपमध्ये जाणार की काँग्रेसमधेच राहणार अशी चर्चा मतदारसंघात सुरु आहे. मात्र आमदार म्हेत्रे नेमकी काय भूमिका घेणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. म्हेत्रे हे आपल्या भाजप पक्षात येणार का ? आणि दुसरीकडे ते काँग्रेस सोडणार का अशी चिंता दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे म्हेत्रेंच्या भूमिकेमुळे भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
लोकसभा निवडणुकीत अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भाजपला ४७ हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अक्कलकोटमध्ये भाजपची लोकप्रियता वाढली असल्याचे दिसून आले आहे. त्यातच नुकतेच काँग्रेसमधे आलेले श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांनी सुद्धा विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून पक्षाकडे अर्ज केला आहे. त्यामुळे आमदार म्हेत्रे यांची चिंता वाढली आहे. मात्र ते ऐनवेळी भाजप प्रवेशाबाबत काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.