मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील जाहीर सभेत भाजपावर घणाघात केल्यानंतर आता भाजपा नेतेही आक्रमक उत्तर देत आहे. शिवसेनेच्या सभेत ना मुख्यमंत्री ना पक्षप्रमुख दिसले. घाबरलेला बिथरलेला आजारी माणूस दिसले. कालच्या भाषणानं मला त्यांची दया येत आहे. मी त्यांच्या डॉक्टरांना विनंती करतो. औषधांचा डोस कमी करावा. आजारी माणसाला इतका त्रास कुटुंब का देतंय? असा सवाल भाजपा आमदार नितेश राणेंनी व्यक्त केला आहे.
नितेश राणे(BJP Nitesh Rane) म्हणाले की, चंद्रकांत खैरे जे बोलले ते अतिशय योग्य बोलले. नवनीत राणा प्रकरणी खैरेंनी शिवसैनिकांची अक्लल गुडघ्यात असते बोलले होते. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रमुखांची अक्कल कुठे असेल हे सांगण्याची गरज वाटत नाही. दुसऱ्या व्यंगाबद्दल भाष्य करता मग तुमच्या मुलाच्या आवाजावरून म्याव म्याव आवाज काढला तर वाईट का वाटतं? उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) उभे राहिले असते तर हवेने उडून दिले गेले असते असं आम्ही म्हणायचं का? तुम्हाला घाबरणारा महाराष्ट्रात कोण नाही. उगाच धमक्या व्यासपीठावरून देऊ नका असं त्यांनी सांगितले.
तसेच मातोश्री नावावर ज्याने हेराफेरी केली तो काल सभेत होता. मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखांच्या आशीर्वादानेच घोटाळे होतात हे सिद्ध झाले आहे. जे मुंबईला अक्षरश: लुटले त्यांच्याविरोधात लढा सुरूच राहणार आहे. भ्रष्टाचारी माणसाचं समर्थन करावं लागत आहे. नवाब मलिकांनी दहशतवाद्यांसोबत आर्थिक व्यवहार केले. त्याला समर्थन करून बाळासाहेबांच्या भूमिकेचा अपमान केला. संभाजीनगर नामांतर करण्याची गरज काय? असं म्हणताय. त्यामुळे त्यांच्यावर उपचारांची गरज आहे असंही नितेश राणेंनी सांगितले.
त्याचसोबत मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा करणं हेच चुकीचे आहे. तुम्हाला टोमणे मारता येतात. पालघरच्या साधूंची हत्या झाली त्यांना अद्याप न्याय मिळत नाही. ज्या रझा अकादमीनं महाराष्ट्रात दंगली घडवल्या त्यावर बंदी घालण्याचं तुमचं हिंदुत्व नाही का? तुमच्या सोयीनुसार हिंदुत्वाची चौकट उभी करताय. शिवसैनिकांनी सोमय्यांवर हल्ला केला म्हणून सुरक्षा दिली. नवनीत राणांवर हल्ला झाला. सुरक्षा का देण्यात येते त्याचा विचार करा. वरूण सरदेसाईंना सुरक्षा का दिलीय याचं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी द्यावं अशी मागणी नितेश यांनी केली.
दरम्यान, महाराष्ट्रात मविआ नेते वेगवेगळ्या मुद्द्यांवर बोलतात. पण मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, एसटी कामगारांचे प्रश्न यावर कुणी बोलत नाही. ओबीसींचं राजकीय नुकसान होतंय त्यावर मुख्यमंत्री काय बोलत नाही. वीज, शेतकरी यांच्यावर बोलत नाही. बाहेरचे मुद्दे वापरायचे पण तुमच्या बुडाखाली काय जळतंय त्यावर बोलणार नाही असा टोला राणेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर लगावला.