सिंधुदुर्ग : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Shivsena MLA Pratap Sarnaik) यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) केलेल्या छापेमारीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांचे पुत्र पूर्वेश आणि विहंग यांच्या घरीदेखील ईडीचे पथक पोहोचले. एढेच नाही, तर त्यांच्या कार्यालयांतही ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले. यानंतर, आता भाजपच्या नेत्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधायला सुरुवात केली आहे. भाजप नेते किरिट सोमय्या आणि नारायण राणे यांच्यानंतर आता आमदार नितेश राणे यांनी सरनाईकांवर झालेल्या कारवाईवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर थेट बाण चालवला आहे.
टीव्ही-9ने दिलेल्या वृत्तानुसार, “मुंबईत वायकर आणि ठाण्यात सरनाईक यांचे भुयारी गटार थेट कलानगरकडे जाते. ईडीचा तपास आणखी खोलवर झाला, तर ते बरोबर कलानगरमध्ये पोहोचतील. चुकीचे काही झाले असेल, म्हणूनच ईडीने कारवाई केली आहे. प्रताप सरनाईक आणि रविंद्र वायकर हा तर एक मुखवटा झाला. त्याचा मागचा कलाकार जो आहे तो कलानगरमध्ये बसला आहे,” असे म्हणत आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे.
काय म्हणाले सोमय्या -तत्पूर्वी, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयात सुरू असलेल्या छापेमारीचे स्वागत केले आहे. 'शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरासह कंपन्यांच्या कार्यालयांवर धाडी टाकल्या जात आहेत. बेनामी, बोगस आणि भ्रष्टाचाराचा पैसा असेल तर कारवाई व्हायला हवी. शिवसेनेचे नेते आणि त्यांचे मुखियादेखील अशाच प्रकारचे उद्योग करतात हे सगळ्यांना माहीत आहे,' असे सोमय्या यांनी म्हटले आहे.
"प्रताप सरनाईक काही साधुसंत नाहीत" -प्रताप सरनाईक यांच्यावर कायदेशीर कारवाई आहे आणि कायदेशीर बाबींमध्ये चौकशी होईपर्यंत प्रतिक्रिया द्यायची नसते. ईडी, सीबीआय, कोर्टाचे निर्णय यांच्या चौकशी पूर्ण झाल्याशिवाय आपण भाष्य करायचे नसते. प्रताप सरनाईक काय साधू संत नाहीत. मीडियाने आधी त्यांची माहिती घ्यावी. ईडीचा छापा पडला, हे योग्य की अयोग्य ते तुम्ही सांगा, मग आम्ही प्रतिक्रिया देऊ, असे नारायण राणे यांनी सांगितले.
आज सकाळी आठ-साठे आठच्या सुमारास ईडीची तीन पथकं तपासासाठी पोहोचली. त्यांनी आमदार प्रताप सरनाईक, त्यांचे दोन पुत्र आणि त्यांच्या कार्यालयात तपास सुरू केला. ईडी नेमक्या कोणत्या प्रकरणात तपास करत आहे, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. सध्या सरनाईक पिता पुत्र देशाबाहेर असल्याचं समजतं. सरनाईक यांच्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना ईडीनं बोलावलं आहे. शिवसेनेच्या इतर काही नेत्यांनादेखील ईडीकडून नोटिसा बजावण्यात आल्या असल्याचं समजतं.
त्यांनी 100 लोकांची यादी द्यावी -शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घर, कार्यालयांवर ईडीने टाकलेल्या छापेमारीवरून शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला. ईडीने कधी भाजप नेत्यांच्या घरी छापा टाकल्याचे मी ऐकलेले नाही. मी १०० माणसांची यादी ईडीला देतो. ईडीने त्यांच्यावर कारवाई करून दाखवावी, असे थेट आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले. यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. 'राऊत यांनी १०० लोकांची यादी माझ्याकडे द्याली. त्यांच्यावर कारवाई होईल, हा माझा शब्द आहे,' असे फडणवीस म्हणाले. शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा महाविकास आघाडीकडून आरोप केला जात आहे. यानंतर भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.