शहापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा हे उद्या, बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांनी मंगळवारी शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत विधानसभा अध्यक्षांकडे जाऊन आमदारकीचा राजीनामा दिला. अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.२0१४ मध्ये मोदी लाटेतही पांडुरंग बरोरा हे शहापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते. भावली पाणी योजनेचा पाठपुरावा त्यांनी केला आहे.
बरोरा यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीची साथ सोडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या शिवसेना प्रवेशामागे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शिवसेनेकडून त्यांना उमेदवारीचे आश्वासन मिळाल्यामुळे माजी आमदार दौलत दरोडा यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक गटबाजीला कंटाळून पक्षांतर केले, की राष्ट्रवादी काँग्रेसचा जनाधार संपल्याने त्यांनी स्वत:च्या राजकीय सोयीसाठी हा निर्णय घेतला, याबाबत आता शहापुरात चर्चा रंगली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत सेनेच्या उमेदवारापेक्षा अवघ्या ५ हजार मतांच्या फरकाने ते निवडून आले होते. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अंतर्गत गटबाजीचा फटका बसला होता.ते अजित पवार यांच्या मर्जीतले असले, तरी स्थानिक गटबाजीमुळे ते आधीपासूनच त्रस्त होते.
जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे आणि त्यांचे वाद जगजाहीर आहेत. भरिस भर माजी मंत्री गणेश नाईक यांचाही त्यांना त्रास होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या शहापूर विधानसभेतून भाजपला तब्बल १५ हजार मतांची आघाडी मिळाली होती. हेच चित्र विधानसभा निवडणुकीत राहिल्यास आपला पराभव निश्चित होईल, हे हेरून आणि तुलनात्मकदृष्ट्या सेनेच्या तिकिटावर विजय मिळण्याची शक्यता जास्त असल्यामुळेच त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांचे निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी दिली.पवारांचे विश्वासू साथीदारपांडुरंग बरोरा हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे विश्वासू साथीदार म्हणून ओळखले जातात. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटस्थ दिवंगत माजी आमदार महादू बरोरा यांचे ते चिरंजीव आहेत. पवार यांच्या राजकीय प्रवासात महादू बरोरा यांनी मोलाची साथ दिली. समाजवादी काँग्रेस, पुलोद आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस अशा त्यांच्या संपूर्ण राजकीय वाटचालीत ते पवार यांच्या सोबतच होते. त्यामुळे पांडुरंग बरोरा यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकणे, हा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का मानला जात आहे.वैयक्तिक स्वार्थासाठी मी आजवर कोणताच निर्णय घेतला नाही. शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई कायमची दूर व्हावी, हे माझे वडील दिवंगत माजी आमदार महादू बरोरा यांचे स्वप्न होते. तालुक्याची पाणीटंचाई दूर करण्यासाठी एकमेव स्वप्नवत योजना म्हणजे भावली पाणीयोजना. ती योजना कार्यान्वित व्हावी, यासाठी मी सुरुवातीपासून प्रयत्न करत होतो. उपोषणाचा मार्गही स्वीकारला. अधिवेशनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत झगडून मी भावलीसाठी प्रशासकीय मंजुरी घेतली. विरोधी पक्षाचा आमदार असल्यामुळे मला खूप संघर्ष करावा लागला. परंतु, शहापूर विधानसभेच्या विकासासाठी मला सातत्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकार्य केले. त्यामुळे मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे.- आमदार पांडुरंग बरोराशिवसेनेत प्रवेश केला म्हणजे बरोरा यांना उमेदवारी मिळेलच, असे नाही. उमेदवारी कुणाला द्यायची, हा निर्णय पक्ष घेणार आहे. गेली २५ वर्षे माझी शिवसेनेशी बांधिलकी आहे. २00९ पर्यंत मी सलग तीनवेळा शिवसेनेचा आमदार म्हणून निवडून आलो. २00४ आणि २0१४ साली अल्प मतांनी पराभूत झालो. मात्र मी पक्षाशी एकनिष्ठ आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न करणार.- दौलत दरोडा, माजी आमदार, शिवसेना