"मी नाईलाजानं अजितदादांसोबत गेलो, पण...": अजित पवारांचा आणखी १ आमदार शरद पवारांकडे जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 02:18 PM2024-08-18T14:18:19+5:302024-08-18T14:20:55+5:30

शरद पवारांचे माझ्या जडणघडणीत मोठे योगदान, त्यांचा कायम ऋणी राहीन असं विधान आमदार राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केले आहे. 

MLA Rajendra Shingane of the NCP Ajit Pawar group is in talks to join the Sharad Pawar group | "मी नाईलाजानं अजितदादांसोबत गेलो, पण...": अजित पवारांचा आणखी १ आमदार शरद पवारांकडे जाणार?

"मी नाईलाजानं अजितदादांसोबत गेलो, पण...": अजित पवारांचा आणखी १ आमदार शरद पवारांकडे जाणार?

वर्धा - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाचे आणखी एक आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. वर्धा येथे एका कार्यक्रमात राजेंद्र शिंगणे यांनी गौप्यस्फोट केला आहे. अजित पवारांसोबत नाईलाजानं गेलो असं विधान शिंगणे यांनी केले. तर राजेंद्र शिंगणे हे शरद पवार गटासोबत जाणार नाही असा दावा खासदार सुनील तटकरेंनी केला आहे.

राजेंद्र शिंगणे म्हणाले की, जवळपास मी ३० वर्ष शरद पवारांसोबत काम केले. माझ्या जडणघडणीत शरद पवारांचा फार मोठा वाटा आहे हे मी मान्यच करतो. आयुष्यभर मी त्यांचा ऋणीच राहणार आहे. मध्यंतरी माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे मी नाईलाजानं अजितदादांसोबत गेलो. आज जिल्हा बँकेला राज्य सरकारने ३०० कोटी दिलेले आहेत. शरद पवार हे नेहमीच माझ्यासाठी आदरणीय राहतील असं त्यांनी सांगितले.

तर राजेंद्र शिंगणे हे बिल्कुल दुसऱ्या गटासोबत जाणार नाहीत. कुठल्यातरी कार्यक्रमाच्या निमित्ताने ते तसं बोलले असतील. आम्हीदेखील शरद पवारांचे गुणगान गातो. त्यात पुढे काही नसते. आम्ही शरद पवारांना दैवत मानतो. आम्ही भूमिका घेतली त्यात ती ठाम राहणार आहे. राजेंद्र शिंगणे यांनी मांडलेली भूमिका ती शरद पवारांप्रती आदर व्यक्त केला असं अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. 

दरम्यान, भाजपाचे लोक शरद पवारांचे कौतुक करत असतात. त्यामुळे हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. सगळ्या पक्षाचे लोक शरद पवारांविषयी चांगले बोलतात ते आमचे भाग्य. राजकारण आणि वैयक्तिक संबंध वेगळे असतात. शिंगणे कुटुंबासोबत आमचे अनेक दशकांचे प्रेमाचे संबंध राहिलेले आहेत. राजेंद्र शिंगणे यांच्याशी कौटुंबिक संबंध आहेत. शिंगणे बँकेच्या अडचणीमुळे अनेक वर्ष अस्वस्थ होते. ते संवेदनशील नेते आहेत. त्यामुळे बँकेत काही अडचणी, आव्हाने होती. जनतेला काही अडचण होऊ नये यासाठी ते प्रयत्नशील होते आणि अनेक वर्ष राहिलेले आहेत असं विधान शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

 

 

Web Title: MLA Rajendra Shingane of the NCP Ajit Pawar group is in talks to join the Sharad Pawar group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.