परभणी - राज्यातील परभणी गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. मात्र चिंतेची बाब म्हणजे गुट्टे कोरोना पॉझिटिव्ह येण्याच्या २४ तास आधी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह एक खासदार, ५ आमदार आणि एक माजी आमदार यांनी एकत्रित जेवण केले होते. त्यानंतर रत्नाकर गुट्टे यांची तब्येत बिघडली. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवली. त्यानंतर चाचणी केली असता गुट्टे यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले.
सोमवारी गंगाखेड मतदारसंघात रेल्वे फ्लायओव्हरचं उद्धाटन होतं. या समारंभासाठी मंत्री अशोक चव्हाण, खासदार संजय जाधव, आमदार अमर राजूरकर, आमदार बाबाजानी दुर्रानी, आमदार सुरेश वरपूडकर, आमदार राहुल पाटील, जितेश अंतापूरकर आणि माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे उपस्थित होते. त्याचवेळी मोठ्या संख्येने सार्वजनिक विभागाचे अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर अशोक चव्हाणांसह सर्व मान्यवर मंडळी रत्नाकर गुट्टे यांच्या घरी पोहचली. या सर्वांनी एकत्रित जेवण केले.
आता रत्नाकर गुट्टे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रशासनाची चिंता वाढली आहे. रत्नाकर गुट्टे यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोनाची चाचणी करण्याचं आवाहन केले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत १५ मंत्री आणि ७० हून अधिक आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. देशात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा हेदेखील कोरोनाबाधित आहेत.
कोरोना रुग्णसंख्येला सोमवारी लागला ब्रेक
गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येला सोमवारी ब्रेक लागला. कोरोना संक्रमितांचा आकडा ३३ हजार ४७० इतका झाला. रविवारच्या तुलनेत सोमवारी १० हजारांनी रुग्णसंख्या घटली. कोरोनामुळे ८ जणांचा मृत्यू झाला. रविवारी कोरोनाचे ४४ हजार रुग्ण आढळले होते. सोमवारी महाराष्ट्रात २९ हजार ६७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. मुंबईतही कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्याचं पाहायला मिळालं. रविवारच्या तुलनेत सोमवारी मुंबईत कोरोना रुग्णसंख्या ६ हजाराने कमी झाली. त्याआधी चारही दिवस कोरोना रुग्णसंख्या २० हजाराहून जास्त येत होती.