Maharashtra Politics: अवघ्या देशभरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या निमित्ताने आमदार रवी राणा यांनी मिरवणुकीचे आयोजन केले होते. यावेळी रवी राणा यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. हनुमान चालीसाचा आवाज मातोश्रीपर्यंत, उद्धव ठाकरेंच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे, असे सांगत रवी राणा यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.
हनुमान जयंतीनिमित्त अमरावतीत नवनीत राणा आणि रवी राणा दाम्पत्याच्या पुढाकारातून सामुहिक हनुमान चालिसा पठणाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तुमच्या रक्तात हिंदूत्व असले पाहिजे. तुमच्या मनामनात हिंदुत्व असले पाहिजे. आमच्या हनुमान चालिसाच्या कार्यक्रमाला सर्वांनी यावे, असे आवाहन करत, हनुमान चालीसाचा आवाज मातोश्रीपर्यंत, उद्धव ठाकरेंच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे. उद्धव ठाकरे जोवर हनुमान चालीसा पठण करत नाहीत तोवर त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत राहील हे नक्की आहे, असा दावाही रवी राणा यांनी केला आहे.
केवळ निवडणूक डोळ्यासमोर हे सगळे करू नका
ज्या मुख्यमंत्र्यांनी प्रभू श्रीरामाचा, भगवान हनुमानाचा विरोध केला. ज्या सरकारने हनुमान चालीसा म्हणणाऱ्या एका महिला खासदाराला तुरुंगात टाकले, ही गोष्ट महाराष्ट्राची जनता कधीच विसरणार नाही. हनुमान जयंतीच्या मिरवणुकीबाबत राणा म्हणाले की, त्यांनीदेखील मिरवणूक काढली पाहिजे. पण मनापासून काढावी, केवळ निवडणूक डोळ्यासमोर हे सगळे करू नका, असा टोला रवी राणा यांनी लगावला. तसेच ज्यांनी प्रभू श्रीरामाचा, भगवान हनुमंताचा अवमान केला, हनुमान चालीसा वाचण्यावरून खासदार नवनीत राणा आणि माझ्यावर राजद्रोह दाखल केला, आम्हाला तुरुंगात टाकले, ते लोक धार्मिक सोंग करून हिंदू मतदारांचं लक्ष वेधून घेत आहेत. परंतु हिंदूंना यांचा खरा चेहरा माहिती आहे, असे रवी राणा म्हणाले.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवरून खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे गटावर टीका केली होती. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आता भाईजान उद्धव ठाकरे असे संबोधले पाहिजे. ३३ महिने मुख्यमंत्री असताना औरंगाबादचे नाव ते संभाजीनगर करू शकले नाही. ३३ महिन्याच्या सरकारमध्ये अमरावती दंगा झाला, तेव्हा का वेदना झाल्या नाहीत, अशी विचारणा करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची लायकी नाही. ज्यांनी फेसबुकच्या माध्यमातून सरकार चालवली ते काय पंतप्रधानांवर टीका करणार. पंतप्रधानांवर टीका करणे योग्य नाही, त्याला उत्तर देण्यासाठी देशाची आणि महाराष्ट्राचे लोक सक्षम आहेत, अशी घणाघाती टीका नवनीत राणा यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"