राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे आमदारांचे बहुमत आहे. पक्षाची संघटनात्मक रचना किंवा पदरचनेनुसार कोणता गट हा पक्ष हे निश्चित होत नाही. त्यामुळे अजित पवार यांच्याकडील बहुमतानुसार अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी पक्ष आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी दिला.
आमदार अपात्रतेसंदर्भातील सर्व याचिका फेटाळून लावल्याने शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांचे आमदार पात्र ठरले आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सात महिन्यांपासून राष्ट्रवादी कुणाची? यावरून सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू होती. राहुल नार्वेकरांच्या या निर्णयावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे.
बाटली तीच औषध फक्त नवीन...आम्ही खरं आहे ते बोललो. पण दिल्लीतून स्क्रिप्ट केली. मग हे नाटक कशाला करायचे?, असा निशाणा रोहित पवारांनी साधला. भाजपाने पक्ष आणि कुटुंब फोडले. विधानसभा अध्यक्षांनी अन्याय करणारा निकाल दिला.ज्या व्यक्तीने घर बांधले त्या व्यक्तीला घरातून बाहेर काढल्यावर शरद पवार आता शांत बसणार नाही. पुन्हा एकदा पक्ष उभा करण्यासाठी शरद पवार आता तयार आहेत. २०२४ साली भाजपा आल्यावर संविधान राहणार नाही, असा दावाही रोहित पवारांनी केला आहे.
...म्हणून राष्ट्रवादी अजित पवारांची
अजित पवार यांच्याकडे विधानसभेतील ५३ पैकी ४१ आमदारांचा पाठिबा आहे. शरद पवार गटाने दाखल केलेल्या अपात्रता याचिकेतही ४१ आमदारांच्या निलंबनाची मागणी केली होती. अजित पवार यांच्याकडे बहुमत असल्याचे लक्षात येते. पक्षाची घटना आणि घटनेनुसार असलेली पक्षनेतृत्त्वाची रचनेवर पक्ष कुणाचा, याचा निर्वाळा देता येणार नाही. बहुमताच्या निकषानुसार अजित पवार यांची खरी राष्ट्रवादी असल्याचे नार्वेकरांनी सांगितले.