'त्या' नेत्याला महाराष्ट्राच्या राजकीय पलटावरून दूर सारणार, हा माझा तुम्हाला वादा; रोहित पवारांचा अजितदादांना शब्द!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 01:04 PM2024-08-14T13:04:48+5:302024-08-14T13:05:35+5:30

क्षमता असलेला नेता बळीचा बकरा ठरला, याचं मात्र पक्षाचा एक कार्यकर्ता आणि एक पुतण्या म्हणून कायम दुःख राहील, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

MLA Rohit Pawars reaction after Ajit Pawar admitted his mistake regarding Baramati Lok Sabha | 'त्या' नेत्याला महाराष्ट्राच्या राजकीय पलटावरून दूर सारणार, हा माझा तुम्हाला वादा; रोहित पवारांचा अजितदादांना शब्द!

'त्या' नेत्याला महाराष्ट्राच्या राजकीय पलटावरून दूर सारणार, हा माझा तुम्हाला वादा; रोहित पवारांचा अजितदादांना शब्द!

NCP Rohit Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती लोकसभेवेळी बहीण सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणं ही माझी चूक होती, अशी जाहीर कबुली दिली. अजित पवारांच्या या भूमिकेवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असताना त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही यावर भाष्य करत अजित पवार यांना एक शब्द दिला आहे. ही कटकारस्थाने करणाऱ्या तसंच महाराष्ट्र नासवणाऱ्या कलाकाराला महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेच्या सहकार्याने राज्याच्या राजकीय पटलावरून एक दिवस नक्की बाजूला सारेल, हा माझा तुम्हाला पक्का वादा आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांनी चूक मान्य केल्यानंतर रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, "खा. सुप्रियाताईंच्या विरोधात सुनेत्रा काकींना उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा असूच शकत नाही अशी खात्री होती. ती चूक होती म्हणून एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्याची तुम्ही कबुली दिली, परंतु तुमचे मित्रपक्ष मात्र उलट प्रचार करत हा दादांचाच निर्णय असल्याचे सांगतात. याला तुम्ही ‘चूक झाल्याचे नाव देत असलात’ तरी प्रत्यक्षात हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता. आता विधानसभेला ‘असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची’ चर्चा आहे," अशी शंका रोहित पवार यांनी उपस्थित केली आहे.

"पुतण्या म्हणून कायम दुःख राहील"

अजित पवारांच्या भूमिकेवर टीका करताना रोहित पवार यांनी भाजपवरही अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. "दबावाला बळी पडणे हा वैयक्तिक विषय असला तरी स्वाभिमान, विचारधारा आणि साहेबांना सोडून तुम्ही भाजपचं मांडलिकत्व स्वीकारलं आणि यामध्ये एक क्षमता असलेला नेता बळीचा बकरा ठरला, याचं मात्र पक्षाचा एक कार्यकर्ता आणि एक पुतण्या म्हणून कायम दुःख राहील. पण ही कटकारस्थाने करणाऱ्या तसंच महाराष्ट्र नासवणाऱ्या कलाकाराला मात्र महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेच्या सहकार्याने राज्याच्या राजकीय पटलावरून एक दिवस नक्की बाजूला सारेल, हा माझा तुम्हाला पक्का वादा आहे," असा शब्द रोहित पवार यांनी अजित पवारांना दिला आहे.

चूक मान्य करताना अजित पवार काय म्हणाले?

"बारामतीत कोणी लाडकी बहीण आहे का तुमची?" असा प्रश्न जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीवरील मुलाखतीदरम्यान अजित पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना ते म्हणाले की, "सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत. राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी आहे, मात्र सर्वच बहिणी माझ्या लाडक्या आहेत. अनेक घरांमध्ये राजकारण चालतं. पण राजकारण हे घरामध्ये शिरून द्यायचं नसतं. लोकसभेला मात्र माझ्याकडून चूक झाली. मी माझ्या बहिणीविरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. तेव्हा पार्लामेंट्री बोर्डाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला गेला. आता एकदा बाण सुटल्यावर माघारी घेता येत नाही. परंतु आज माझं मन मला सांगतं तसं व्हायला नको होतं," असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.

Web Title: MLA Rohit Pawars reaction after Ajit Pawar admitted his mistake regarding Baramati Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.