मुंबई – सर्वसामान्य नोकरदार, कर्मचारी वर्ग जसा दर महिन्याला पगार कमवतो तसेच राजकीय लोकप्रतिनीधींबाबतही आहे. कोरोना काळात तर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे बेरोजगारी वाढली. परंतु तुम्ही निवडून दिलेल्या आमदारांना दर महिन्याला पगार मिळत होता. एकदा निवडून आलं आणि ५ वर्ष काम केलं तरी आयुष्यभराची पेन्शन सुरु होते.
आमदार, खासदार यांना लाखो रुपये पगार मिळतात. पण तुम्हाला माहित्येय का एका आमदाराला दर महिन्याला राज्य शासनाकडून किती पगार मिळतो? बरं या पगारतही सर्वसामान्यांप्रमाणे महागाई भत्ता आणि इतर सवलती दिल्या जातात. अलीकडेच केंद्राने सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २१ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. भविष्यात राज्यातही शासकीय कर्मचाऱ्यांना ही सुविधा दिली जाऊ शकते. सागर उगले नावाच्या आरटीआय कार्यकर्त्याने विधिमंडळात माहिती अधिकाराद्वारे १ एप्रिल २०२० ते ३० जून २०२१ या कालावधीत विधानसभा आणि विधान परिषदेच्या आजी-माजी सदस्यांना वेतन, भत्ते, इतर सर्व भत्ते, सेवा-सुविधा अंतर्गत दरमहा किती रक्कम अदा करण्यात आली याबाबत माहिती मागवली.
त्यानंतर विधिमंडळाने विद्यमान सदस्यांचे वेतन आणि भत्ते यांची सविस्तर माहिती दिली. कोविड महामारीमुळे सर्व विधानसभा, विधान परिषद आमदारांचे वेतन एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत ३० टक्के कपात करण्यात आली होती. त्याप्रमाणे आमदारांना या काळात केवळ ७० टक्के पगार मिळत होता.
आमदारांना एप्रिल २०२० ते मार्च २०२१ कालावधीत खालील प्रमाणे पगार देण्यात आला.
१ | वेतन | १ लाख २७ हजार ५४० रुपये |
२ | महागाई भत्ता २१ टक्के | २१ हजार ६८२ रुपये |
३ | दुरध्वनी | ५ हजार ६०० रुपये |
४ | टपाल | ७ हजार रुपये |
५ | संगणक चालक | ७ हजार रुपये |
६ | एकूण वेतन दरमहा | १ लाख ६८ हजार ८८२ रुपये |
७ | व्यवसाय कर | २०० रुपये |
८ | स्टँम्प वजाती | १ रुपये |
९ | निव्वळ एकूण वेतन | १ लाख ६८ हजार ६२१ रुपये |
एप्रिल २०२१ ते जून २०२१ पर्यंतचं वेतन(१०० टक्के)
१ | वेतन | १ लाख ८२ हजार २०० रुपये |
२ | महागाई भत्ता २१ टक्के | ३० हजार ९७४ रुपये |
३ | दुरध्वनी | ८ हजार रुपये |
४ | टपाल | १० हजार रुपये |
५ | संगणक चालक | १० हजार रुपये |
६ | एकूण वेतन दरमहा | २ लाख ४१ हजार १७४ रुपये |
७ | व्यवसाय कर | २०० रुपये |
८ | स्टँम्प वजाती | १ रुपये |
९ | निव्वळ एकूण वेतन | २ लाख ४० हजार ९७३ रुपये |