मुंबई - विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, सर्वच पक्षातील इच्छुक कामाला लागले असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी विद्यमान आमदारांना पक्षातील इच्छुक डोकेदुखी ठरत आहे. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यामान आमदार बाळसाहेब सानप यांच्या विरुद्ध पक्षातीलच नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली असल्याने सानप यांच्या अडचणी वाढल्या असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे सानप यांना उमेदवारी देऊ नयेत या मागणीसाठी मतदारसंघातील इच्छूकांनी मुंबई गाठून पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांच्या विरोधापेक्षा पक्षातील विरोध आमदार सानप यांच्यासाठी अडचणीचे ठरत आहे. सानप यांच्याविरुद्ध पक्षातील इच्छुकांचा एक गट सक्रीय झाला असून, त्यांच्याकडून सानप यांच्या उमेदवारीला विरोध होत आहे. विशेष म्हणजे सानप यांना उमेदवारी देऊ नयेत म्हणून पक्षातील काही नेत्यांनी गिरीश महाजन यांची भेट घेतली असल्याचे समोर आले आहे.
गेल्या पाच वर्षात भाजप पक्षातील नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना संधी न देता बाहेरील मंडळींच्या हातात सत्ता देण्यात आली असल्याचा आरोप सुद्धा यावेळी करण्यात आले. नाशिक पूर्व मतदारसंघात उमेदवार बदलण्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून भाजपच्या गटात सुरु आहे. मात्र आता आमदार सानप यांच्या उमेदवारीला उघडपणे विरोध होताना पाहायला मिळत आहे.
गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीत युती न झाल्याने भाजप-शिवसेना वेगवेगेळे लढले होते. नाशिक पूर्व मतदारसंघातून आमदार सानप आणि चंद्रकात लवटे यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी सानप यांना ७८ हजार ९४१ मते पडली होती. तर ४६ हजार ३७४ मताधिक्याने सानप यांचा विजय झाला होता. यावेळी युती निश्चित समजली जात असल्याने ही जागा भाजपकडेच राहणार आहे. मात्र असे असले तरीही सानप यांना पक्षातील विरोध पाहता त्यांच्या अडचणी वाढू शकतात अशी चर्चा आहे.