बीड – सत्ता की साहेब...? असा लोकांनी मला प्रश्न विचारला, प्रश्न संपण्याच्या आत साहेब उत्तर दिले. विचारही केला नाही. मला काकूंनी हयात असताना सांगितले होते साहेबांनी भूमिका घेतलीय त्यांच्या पायापाशी राहा. साहेब तुमच्या पायाशी कायम राहीन. मी सत्तेच्या बाहेर पडल्यानंतर काही ठराविक आमदारांमध्ये होतो. तेव्हा एका आमदाराने विचारलं, आम्ही सत्तेत आहोत, आमच्यासोबत मोदी आहेत तुमच्याकडे काय आहे? त्यावर मी म्हटलं आमच्याकडे साहेब आहेत. बीड जिल्ह्याची, मराठवाड्याची जनता स्वाभिमानी आहे. कुणीही इकडे तिकडे गेले तरी जनता तुमच्या विचारांसोबत राहणार अशा शब्दात आमदार संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले की, जिल्ह्यातल्या लोकांना काही कळाले नाही. त्यांचा गैरसमज झाले. आता ते लोकांमध्ये जातील तेव्हा लोकं निश्चित त्यांना त्यांची जागा दाखवून देतील. मी कुणाचे नाव घेतले नाही. व्यासपीठावर भाषण जोरजोरात करायचे. कुणाचा पण नाद करायचा पण साहेबांचा नाद करायचा नाय...असं म्हटलं. कुणीही लोकं सोडून गेले तरी लोकं शरद पवारांसोबत आहे. त्यामुळे सोडून जाणाऱ्यांमुळे काही फरक पडणार नाही असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत शरद पवारांनी देशाची भूमिका ठरवण्याचा मान बीड जिल्ह्याला दिला, त्याबद्दल आभारी आहे. भूमिका ही राजकारणात सर्वात महत्त्वाची असते. मी जिल्हा परिषद, पंचायत समितीला आघाडी केली होती. काहीही झाले तरी आम्ही शरद पवारांसोबत आहे असं सांगितलं. पंचायत समिती गेली, जिल्हा परिषद धुडकावून लावली पण आम्ही शरद पवारांना सोडलं नाही. साहेबांनी मला तिकीट दिलं आणि त्यांच्या आशीर्वादानेच मी निवडून आलो असं आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं.
वारंवार मी भूमिका शब्द बोलतोय कारण...
सध्याच्या परिस्थिती महाराष्ट्रात पहिल्यांदाच झाली. दरवर्षाला सरकार बदलतंय. पहाटेच्या शपथविधीला मला जयंत पाटलांचा फोन आला. माझी भूमिका तेव्हा स्पष्ट होती. दुसऱ्यांदाही तीच वेळ आली तेव्हाही सोशल मीडियावर आमदार म्हणून मी माझी भूमिका स्पष्ट केली. मी वारंवार भूमिका हे शब्द का बोलतोय. जेव्हा आपण निवडणुकीत उभे राहतो. तेव्हा पक्षाची भूमिका घेऊन लोकांपर्यंत प्रचाराला जातो. ती भूमिका बघून, पुरोगामी विचार पाहून त्याला लोकांनी मतदान केले असंही संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.
दरम्यान, मला जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. जेव्हा आमदार झालो तेव्हा लोकांनी इतका सत्कार केला नाही तितका जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यावर लोकांनी सत्कार केले. मतदारसंघात बैठका झाल्या. जिल्ह्यात बैठका घ्यायला निघालो, मी एकटाच आमदार होतो. प्रत्येक बैठकीला निष्ठावंत लोकं उपस्थित राहिले. प्रत्येक तालुक्यावर बैठक घेतली. बैठकीचे रुपांतर अनेकदा सभेत झालो. मी एका दिवसात इतका लोकप्रिय कसा झालो मला कळालं नाही. परंतु ही माझी जादू नव्हे तर शरद पवारांची जादू आहे अस आमदार क्षीरसागर यांनी व्यासपीठावरून सांगितले.