मुंबई - Sanjay Shirsat on Uddhav Thackeray ( Marathi News ) उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस जे बोलले ते खरे आहे. नागपूरला यायचं, प्रेससमोर जायचं, पत्रकारांशी बोलायचे, संध्याकाळी आमदारांची बैठक घ्यायची. जेवण, चहाची वेळ झाल्यावर जायचं, केवळ सभागृहात उपस्थिती दाखवली असा टोला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरेंना लगावला.
आमदार संजय शिरसाट म्हणाले की, सभागृहात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर एवढे बोलले गेले. बाहेर जे पोपटपंची करतात तेच भाषण सभागृहात केले असते. शेतकऱ्यांचा कळवळा दाखवला असता. आरक्षण चाललंय त्यावर बोलले असते. जे मोर्चे निघाले त्यावर सभागृहात भाष्य केले असते तर कदाचित तो मेसेज गेला असता. परंतु आपल्याला जे व्यासपीठ दिलंय, जिथे जनतेचे प्रश्न मांडले जातात तिथे काही बोलायचे नाही. पत्रकार परिषद घेतली म्हणजे आपले काम संपले. सभागृहात केवळ यायचे, बसायचे आणि दर्शन देऊन निघून जायचे इतकेच काम अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी केले अशी टीका त्यांनी केली.
तसेच संजय राऊतांना बाकीच्या ठिकाणी नाक खुपसता येते. टेंडरमध्ये झालेले घोटाळे माहिती नाहीत. चौकशीचा रोख त्यांच्या दिशेने जातोय. या सर्वांची कल्पना संजय राऊतांना आहे. बाकीचे आठवणार नाही. शिवसैनिकांनी भाजपाकडून स्क्रिप्ट घ्यावी हे शिकलोय का? आम्हाला स्क्रिप्ट वाचण्याची गरज नाही. आम्ही जे बोलतो ते रोखठोक सभागृहात बोलतो. आदित्य ठाकरेंना अटक करून आम्हाला मेडल मिळवायचे आहे का? जर ते दोषी असतील जेलमध्ये जातील. संजय राऊत तुम्ही शरद पवारांची स्क्रिप्ट वाचताय असं प्रत्युत्तर संजय शिरसाट यांनी राऊतांना दिले.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी सरकार गंभीर आहे. सरकार म्हणून आमची भूमिका आंदोलनकर्त्यांना समजावून सांगतोय. राज्यातील वातावरण बिघडू नये अशी काळजी घेतेय. सरकार जनतेचे आहे. त्यामुळे जनतेशी बोलायला कमीपणा वाटत नाही. संवादातून मार्ग मिळत असेल आणि आरक्षणाचा मुद्दा सुटत असेल तर गैर नाही असं आवाहन आमदार संजय शिरसाट यांनी मराठा आंदोलकांना केले आहे.