काँग्रेसच्याअमरावती विधानसभा मतदारसंघातील आमदार सुलभा खोडके यांच्यावर पक्षाने मोठी कारवाई केली आहे. सुलभा खोडके यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत त्यांचं पक्षामधून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिलेल्या सूचनेनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही कारवाई केली आहे.
मागच्या काही काळापासून सुलभा खोडके ह्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. तसेच काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांमध्ये सुलभा खोडके यांचाही समावेश असल्याचा दावा केला जात होता. त्यातच नुकतीच त्यांनी अमरावतीमध्ये जोरदार बॅनरबाजीही केली होती. त्यानंतर आता सुलभा खोडके यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, सुलभा खोडके ह्या लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असून, त्या अमरावतीमधून अजित पवार गटातून विधानसभा निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.