Varsha Gaikwad On Baba Siddique: महाराष्ट्र काँग्रेसला धक्का देत माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी आज पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. सिद्दीकी यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सिद्दीकी यांच्या निर्णयानंतर माजी मंत्री आणि आमदार वर्षा गायकवाड यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. पक्ष अडचणीत असताना सिद्दीकी यांनी पक्ष सोडल्याने वर्षा गायकवाड यांनी त्यांना लक्ष्य केले. सिद्दीकी म्हणाले की, मी तरुण असताना काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि आज ४८ वर्षांनी पक्ष सोडत आहे. माझा हा प्रवास खूप छान होता. मी आज माझ्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. अजून अनेक गोष्टी आहेत ज्या आता सांगणे योग्य होणार नाही. काही गोष्टी या न सांगितलेल्याच बऱ्या असतात. माझ्या या प्रवासात ज्या-ज्या लोकांनी मला पाठिंबा दिला, त्यांचा मी आभारी आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करत वर्षा गायकवाड यांनी म्हटले, "तुमच्यावर काँग्रेस पक्षाने ठेवलेला विश्वास, दिलेला एवढा सन्मान असे असताना देखील तुम्ही पक्षातून बाहेर जात आहात हा तुमचा निर्णय अत्यंत निराशाजनक आणि सर्वात खेदजनक आहे. आपला देश एका नाजूक वळणावर असताना आणि संपूर्ण काँग्रेस परिवार भाजपाने केलेल्या लोकशाहीच्या हत्येविरुद्ध लढण्यात व्यग्र असताना तुम्ही हे करण्याचे निवडले आहे. हे अगदी खरे आहे, तुम्ही म्हटल्याप्रमाणे सर्वकाही सांगणे योग्य नसते. असो काँग्रेस पक्ष आपल्या शहराची, देशाची सेवा प्रामाणिकपणे आणि समर्पणाने करण्याच्या वचनबद्धतेवर ठाम आहे. या प्रकारच्या घटना आमच्या मार्गात अडथळा आणू शकत नाहीत. आमचे एकच लक्ष्य आहे, सर्वांसाठी न्याय."
महाराष्ट्र काँग्रेसला आणखी एक धक्कालोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत काँग्रेसला माजी मंत्री मिलिंद देवरां यांच्या रुपाने मोठा धक्का बसला होता. त्यातच आता काँग्रेसला आणखी एक धक्का बसला. काँग्रेसचे वांद्रे येथील बडे नेते माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला रामराम केले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिद्दिकी हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करण्यासाठी गाठीभेटी घेत आहेत. या वाटाघाटी यशस्वी झाल्या आहेत, त्यामुळे ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करण्याची चर्चा आहे. काँग्रेसमध्ये महत्त्व मिळत नसल्याने तसेच महाविकास आघाडी सरकार असताना निधी वाटपात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून झालेल्या कथित अन्यायाच्या पार्श्वभूमीवर सिद्दीकींची नाराजी वाढत गेली असे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत गेली ४८ वर्षे काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या बाबा सिद्दीकींनी पक्षाला रामराम ठोकल्याचे सांगितले जात आहे.