पुणे : राज्यातील पाणी व्यवस्थापन हा शासनाच्या अजेंड्यावरील प्रमुख विषय आहे. ज्याप्रमाणे ग्रामीण भागात जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे, त्याचप्रमाणे शहरी भागात रेन वॉटर हार्वेस्टिंग महत्त्वाचे आहे. राज्यातील २००२ नंतरच्या सर्व बांधकामांना रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक आहे, परंतु त्या पूर्वीच्या गृहरचना संस्थांना हा प्रकल्प राबवायचा असल्यास आमदार निधीतून मदत केली जाईल, अशी माहिती आमदार मेधा कुलकर्णी यांनी दिली.‘रेन वॉटर हार्वेस्टिंग - काळाची गरज’ याविषयी कोथरूड भाजपाच्या वतीने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रकाश बालवडकर, जयंत भावे, अजय मारणे, रामबाग विकास मंडळाच्या सचिव केतकी कुलकर्णी, डॉ. संदीप बुटाला, मंदार घाटे उपस्थित होते. या वेळी कर्नल शशिकांत दळवी (निवृत्त) यांनी या विषयाचे संगणकाद्वारे सादरीकरण केले. दळवी यांनी सांगितले, ‘पुण्याला पाणीपुरवठा करणारे धरण बांधण्यात आले, त्या वेळी शहराची लोकसंख्या ५ लाख होती, जी आता ८ पटीने वाढली आहे. दिवसेंदिवस त्यामध्ये वाढच होत जाणार आहे; परंतु धरणांची क्षमता वाढू शकणार नाही. त्यामुळे पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी नैसर्गिकरीत्या मिळणारे पावसाचे पाणी योग्य रितीने साठविणे आवश्यक आहे. आज अनेक सोसायट्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा यशस्वी वापर केल्यास टँकरने पाणी मागविण्याची गरज भासणार नाही आणि पैशाचीही बचत होईल.’
रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पासाठी आमदार निधीतून मदत करणार
By admin | Published: June 27, 2016 12:57 AM