औरंगाबाद - राज्यात झालेल्या सत्तानाट्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल ५० आमदारांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात भूमिका घेतली. त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले. बहुमत गमावल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येत राज्यात सत्ता आणली. शिंदे मुख्यमंत्रिपदी तर फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली.
शिंदे-फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळेल या अपेक्षेने अनेक जण मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष लावून होते. त्यात ९ ऑगस्टला राज्यातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र त्यात नाव नसल्याने शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली. दुसऱ्या विस्तारात स्थान मिळेल याच अपेक्षेवर शिरसाट आहे. परंतु शिरसाट यांच्या मनातील खंत त्यांनी पुन्हा एकदा भरव्यासपीठावर बोलून दाखवली.
आमदार संजय शिरसाट म्हणाले की, भाजपाचे मंत्री अतुल सावे यांच्या वडिलांसोबत मी काम केले. मात्र माझ्यानंतर अतुल सावे राजकारणात आले. राज्यमंत्री झाले, कॅबिनेट मंत्री झाले. आमच्याकडे पाहा ना. अतुल सावे मागून आले दोनदा मंत्री झाले. राजकारणात आजकाल सिनेरिटीचे काहीच राहिलेले नाही असं वाटू लागलंय असं सांगत त्यांनी व्यासपीठावरून नाराजी व्यक्त केली. आमदार शिरसाट यांच्या मतदारसंघात रस्त्याच्या कामाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
तसेच एकमेकांच्या विरोधात बोलून कधीही महत्त्व वाढत नाही. कामाची जोड त्यासाठी लागते. मी मतदारसंघात काय केले. शहरासाठी काय केले त्याला महत्त्व आहे. आज व्यासपीठावर शिवसेना-भाजपा दिसतेय परंतु निवडणुकीत सोबत राहा. एकजूट राहा. लढण्यासाठी इतर आहेत. आपल्यामध्ये फाटाफूट दिसतेय असा संभ्रम राहू नये. सावेंवर मंत्रिपदाची जबाबदारी आहे. त्याचा फायदा मतदारसंघाला झाला पाहिजे असंही आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं.
दरम्यान, अतुल सावे आणि मी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे गेलो होतो. प्रत्येक निवेदनावर तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश देतात. निधी तातडीने उपलब्ध करून दिला जातो. परंतु मागील अडीच वर्षात मी एखाद्या पत्रावर मुख्यमंत्र्यांची सहीच पाहिली नाही असं सांगत शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता टोला लगावला. मतदारसंघातील कामं खोळंबली होती. त्याला गती देण्याचं काम या २ महिन्यात झाले असंही शिरसाट यांनी सांगितले.