मुंबई - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेनेतील वर्चस्वाची लढाई सुरू आहे. शिवसेनेच्या एकूण आमदारांपैकी दोन तृतीयांश आमदार हे शिंदे गटात सहभागी झालेत. ठाकरे गटातील २-३ आमदार लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत सहभागी होतील असा दावा मंत्री संदीपान भुमरे यांनी केला तर त्याला प्रत्युत्तर देत शिंदे गटाचेच १०-१५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा प्रतिदावा माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी केला.
चंद्रकांत खैरे म्हणाले की, शिवसेनेचे कुणीही तिकडे जाणार नाही. परंतु शिंदे गटातील अनेक आमदार अस्वस्थ आहेत. आम्हाला फोन करून चुकलो म्हणतात. १०-१५ आमदार आहेत जे संपर्कात आहेत. भाजपा काहीही गेम खेळतील आणि सरकारमध्ये पूर्ण बहुमत सिद्ध करत आपल्याला आऊट करतील हे आमदारांना कळालंय असं त्यांनी म्हटलं.
तर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार अतिशय ताकदीने महाराष्ट्रात काम करतेय. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशनही सरकारने यशस्वीपणे सांभाळलं. येणारी अडीच वर्ष, २०२४ पर्यंत महाराष्ट्रात हेच सरकार कायम राहणार आहे. त्यामुळे हे आमच्या संपर्कात अशी विधाने केली जात आहे. उर्वरित १०-१५ आमदार शिवसेनेत राहतील का? याची काळजी खैरेंनी करावी असा टोला भाजपा आमदार नितेश राणेंनी लगावला.
काय म्हणाले होते संदीपान भुमरे? संदीपान भुमरे यांनी पैठण येथील कार्यक्रमात बोलताना हा दावा केला. भुमरे यांनी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव सेनेत सध्या मुक्कामी असलेले दोन आमदार लवकरच फुटून शिंदे सेनेत येणार आहेत. एक जण येऊन आम्हाला भेटला असून दुसरा सुद्धा संपर्कात असल्याचे भुमरे यांनी सांगितले. कोकण, मराठवाड्यातील आमदार संपर्कात आहेत. त्याचसोबत मराठवाड्यातील जिल्हाप्रमुख १-२ वगळता सगळेच संपर्कात आहेत. ८० टक्के पदाधिकारी आमच्या संपर्कात आहेत. जसजसे भेटतील तसे पक्षप्रवेश होतील असं भुमरेंनी म्हटलं. मात्र भुमरेंच्या या दाव्यावर ठाकरे गटातील आमदार अंबादास दानवे यांनी टीका केली. पैठणमधील भूमरेंच्या कार्यक्रमाला ५० लोकही नव्हते. अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यामुळे आधी स्वत:चं सांभाळा, अशी टीका अंबादास दानवेंनी केली होती.