कणकवली : कणकवली मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार नीतेश राणे यांनी बुधवारी कणकवली एस.टी. स्थानकाला अचानक भेट दिली. तसेच त्यांनी कणकवली- फोंडा या मार्गावर एस.टी.ने प्रवासदेखील केला. एस.टी. ने प्रवास करताना त्यांनी एस.टी.मधील प्रवाशांशी संवाद साधला. प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी हा मार्ग अवलंबिला. मात्र, या विषयाची चर्चा जिल्हाभरात होत होती.नीतेश राणे यांनी कणकवली मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्यानंतर सतत लोकांमध्ये जावून प्रश्न समजावून त्यांना वाचा फोडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे या अगोदरच जाहीर केले आहे. त्याप्रमाणे बुधवारी ते दौऱ्यावर आले असताना सर्वप्रथम त्यांनी काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.त्यानंतर त्यांनी पत्रकारांनासोबत घेवून कणकवली बसस्थानक गाठले. मागील आठवड्यात बसस्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत एक जण गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे बसस्थानकावरील प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी अचानक स्थानक गाठले. एस.टी. महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांशी आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी प्रवाशांच्या प्रत्यक्षात नेमक्या समस्या काय आहेत. ते जाणून घेणे गरजेचे आहे. मग अधिकाऱ्यांशी बोलणे सोपे जाईल, असे सांगत नीतेश राणे यांनी स्थानकावर यावेळी उपस्थित असणाऱ्या काही प्रवाशांच्या भेटीगाठी घेतल्या. तसेच त्यावेळी कणकवली फोंडा ही गाडी फोंड्याकडे निघाली होती. त्यामुळे त्या गाडीत त्यांनी प्रवेश केला. गाडी यावेळी प्रवाशांनी भरलेली होती. गाडीत राणे यांच्यासमवेत काही पत्रकार आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते.कणकवली ते फोंडा असा २0 किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला. या प्रवासादरम्यान, काही वेळ गाडीत उभे राहून त्यांनी गाडीत असलेल्या प्रवाशांशी संवाद साधण्याचा प्रयत्नदेखील केला. (विशेष प्रतिनिधी)कणकवलीचे नवनिर्वाचित आमदार नीतेश राणे यांनी बुधवारी कणकवली-फोंडा एस.टी. ने प्रवास करत प्रवाशांशी संवाद साधला.प्रवाशांसाठी बनला कुतूहलाचा विषयनीतेश राणे यांना कणकवली मतदारसंघातून काँग्रेसचा अधिकृत उमेदवार म्हणून प्रचार करायला फार कमी कालावधी मिळाला होता. मात्र, मिळालेल्या कालावधीत त्यांनी मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांमध्ये मतदारांशी थेट संपर्क साधला. त्यामुळे अल्पकालावधीत त्यांनी मोठे यश मिळविले. त्यानंतर निवडणुकीपूर्वी त्यांनी जाहीर केले होते की आपण आमदार झाल्यानंतर सतत लोकांशी थेट संपर्कात राहून त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार. त्याप्रमाणे त्यांनी कार्यवाहीसही सुरूवात केली. नीतेश राणे अचानक एस.टी.तून प्रवास करण्यास आल्याने प्रवाशांसाठी तो कुतुहलाचा विषय होता.
आमदारांनी केला एस.टी. ने प्रवास
By admin | Published: November 05, 2014 10:53 PM