आमदार झाल्यावर मी हवेत होतो, त्यानंतर...; अमोल मिटकरींनी दिली थेट कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 10:52 AM2022-07-24T10:52:37+5:302022-07-24T10:53:14+5:30
मी टीव्हीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांना पाहायचो. मी डोळ्यासमोर कधी पाहिले नव्हते पण आज यांच्या बाजूला बसण्याचा सन्मान मला मिळाला ते केवळ अजित पवार यांच्यामुळेच असं कौतुक आमदार अमोल मिटकरींनी केले आहे.
पुणे - आमदार झाल्यावर मी हवेत होतो, मी गावात गेलो, पाणीपुरीच्या दुकानावर गेलो तेव्हा लोकं म्हणाली हा आमदार झाला, गेल्या २ महिन्यापासून बोलतही नव्हता. तेव्हापासून लोकांशी बोलणं हळूहळू सुरु केले. गोरगरिबांशी संपर्क ठेवला. अजित पवारांचा आदर्श ठेवून संपर्क वाढवला. ग्रामपंचायत आली पाहिजे यासाठी प्रयत्न केला. भाजपा, वंचित बहुजनच्या हाती माझ्या गावची सत्ता असायची. ग्रामपंचायतीत आता १३ पैकी ११ जागा राष्ट्रवादीच्या आहेत अशा शब्दात आमदार अमोल मिटकरी यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं कौतुक केले.
अमोल मिटकरी म्हणाले की, मी टीव्हीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांना पाहायचो. मी डोळ्यासमोर कधी पाहिले नव्हते पण आज यांच्या बाजूला बसण्याचा सन्मान मला मिळाला ते केवळ अजित पवार यांच्यामुळेच. कारण वकृत्वामुळे मी प्रसिद्ध परंतु त्याची पारख करणारी लोक कमी आहेत. बारामतीत ३ दिवस मुक्काम केल्याशिवाय इथं उभं केलेले साम्राज्य पाहिल्यासारखं वाटत नाही. आमचे काही नेते टाळ्या वाजवल्यावर भलत्याच प्रवाहात वाहत जातात. भविष्य पुढे गाठायचं आहे, थोडं सांभाळून राहत जा असा कानमंत्र अजितदादांनी दिला. माझ्यासाठी हा बूस्टर डोस होता. स्वच्छतेच्या बाबतीत अजित पवार खूप काळजी घेतात. माझ्या ४ वर्षाच्या काळात मला अजितदादांना फार जवळून अभ्यासता आलं. पुढे पुढे करणारा कार्यकर्ता अजितदादांना आवडत नाही. ते बरोबर ध्यानात ठेवतात असं त्यांनी सांगितले.
तसेच अजित पवारांमुळे कोरोना काळात राज्याची अर्थव्यवस्था डबघाईला आली नाही हे विसरता येणार नाही. शहाजी बापू पाटलाला ३८० कोटीपेक्षा जास्त निधी दिला. बारामतीला निधी पळवला हे सोप्पं असतं का? निधीची मागणी करणे, त्याची तरतूद करणे ही प्रक्रिया आहे. आता सगळ्या निर्णयांना स्थगिती दिली जातेय. वयाच्या ६३ व्या वर्षी तरूणांमध्ये प्रसिद्ध असलेला एकमेव नेता म्हणजे अजित पवार आहे असं अमोल मिटकरी म्हणाले.
दरम्यान, मी दीपक केसरकरांनी अनेकदा अजित पवारांच्या दालनात पाहिले. निधी देताना कधीही दुजाभाव केला नाही. टार्गेट एकाच व्यक्तीला केले जाते ते अजित पवारांमुळे. अजित पवारांनी पहाटेची शपथ घेतली नसती तर राज्यातील राष्ट्रपती राजवट उठली नसती. औरंगजेबाच्या छावणीत घुसून त्याचे कळस जसे काढले हे त्याला कळालं नाही. तसं भाजपाला कळालं नाही असा टोला आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपाला लगावला.