Satyajeet Tambe On Ashok Chavan ( Marathi News ) : राज्यसभेच्या सहा जागा आणि लोकसभेची निवडणूक तोंडावर आलेली असतानाच ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीसह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत पक्षाला मोठा धक्का दिला आहे. चव्हाण यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे काही आजी-माजी आमदारही पक्ष सोडतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यात काँग्रेसची पडझड होत असल्याचं चित्र असून विधानपरिषद निवडणुकीवेळी पक्षावर नाराज होऊन बाहेर पडलेले युवा नेते आणि विधानपरिषदेतील आमदार सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसची अवस्था पाहून वेदना होत असल्याचं म्हटलं आहे.
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर एक्सवर पोस्ट लिहीत सत्यजीत तांबे यांनी म्हटलं आहे की, "महाराष्ट्रातील कॉंग्रेस पक्षाची स्थिती पाहून मनाला खूप वेदना होत आहेत. ज्या संघटनेसाठी मी आयुष्याचे २२ वर्ष तन, मन, धनाने दिली, त्याची ही हालत पाहून अस्वस्थ झालोय," अशा शब्दांत सत्यजीत तांबे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
काँग्रेसची अवस्था पाहून अस्वस्थ झालेल्या आमदार तांबे यांनी "खूप काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही," असंही म्हटलं आहे. त्यामुळे सत्यजीत तांबे यांच्या मनात नेमकी काय खदखद आहे जी ते व्यक्त करू शकत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, सत्यजीत तांबे यांनी विधानपरिषद निवडणुकीवेळी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र काँग्रेसकडून त्यांचे वडील सुधीर तांबे यांना नाशिक पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती आणि पक्षाकडून एकाच वेळी कुटुंबातील दोन सदस्यांना उमेदवारी देता येणार नाही, असं सांगितलं गेलं होतं. या सगळ्या नाट्यानंतर नाराज झालेल्या सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तांबे यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही संघर्ष झाला होता. त्यामुळे आज सत्यजीत तांबे यांनी लिहिलेल्या पोस्टचा रोख नाना पटोले यांच्याकडेच असल्याचं बोललं जात आहे.