अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) राज्यात २ कोटी २६ लाख ५५ हजार मजूर जाॅबकार्डधारक असून, त्यापैकी राज्यातील ३२ हजार ४४९ मजुरांचे आधार क्रमांक अद्याप बॅंक खाते क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्यात आले नाही.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात काम करणाऱ्या जाॅबकार्डधारक मजुरांच्या थेट बॅंक खात्यात मजुरीची रक्कम जमा करण्यात येते. त्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत ‘जाॅबकार्डधारक ’ मजुरांचे आधार क्रमांक बॅंक खाते क्रमांकाशी ‘लिंक ’ करणे आवश्यक आहे. ग्रामरोजगार सेवकांमार्फत संबंधित पंचायत समिती स्तरावर मजुरांचे आधार क्रमांक बॅंक खाते क्रमांकाशी ‘लिंक’ करण्याचे काम करण्यात येते. नरेगा अंतर्गत राज्यात २ कोटी २६ लाख ५५ हजार जाॅबकार्डधारक मजूर असून, त्यापैकी ३२ हजार ४४९ मजुरांचे आधार क्रमांक अद्याप त्यांच्या बॅंक खाते क्रमांकाशी ‘लिंक’ करण्याची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे आधार ‘लिंक’ विना असलेल्या मजुरांचे आधार क्रमांक बॅंक खाते क्रमांकांशी ‘लिंक ’ करण्याचे काम केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.