ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रिक्षा फोडण्याच्या चिथावणीखोर वक्तव्याचा समाचार घेणारे भाजपचे आमदार योगेश सागर यांच कार्यालय गुरुवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडलं. राज ठाकरे यांनी आधी स्वत:हा एक रिक्षा जाळावी नंतर कार्यकर्त्यांना सांगावे अशी आव्हानात्मक टिका योगेश सागर यांनी केली होती.
त्यानंतर आक्रमक झालेल्या मनसैनिकांनी योगेश सागर यांच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. योगेश सागर कांदिवली पश्चिममधील चारकोप मतदारसंघातील भाजपचे आमदार आहेत. व्यावसायिक राहुल बजाज यांच्या फायद्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने तातडीने ७० हजार रिक्षा परवाने वाटपाचा निर्णय घेतला आहे.
११९० कोटी रुपयांचा हा व्यवहार आहे असा आरोप राज यांनी बुधवारी मनसेच्या दहाव्या वर्धापनदिन मेळाव्यात बोलताना केला होता. नवीन रिक्षा तुम्हाला रस्त्यावर दिसली तर प्रवासी आणि चालकाला उतरवून ती जाळून टाका असा चिथावणीखोर आदेश त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता. त्यावर योगेश सागर यांनी आज बोचरी टिका केली होती.