राजकारणाचा चिखल झालाय, चीड व्यक्त करा; "एक सही संतापाची", राज्यात मनसेचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 01:57 PM2023-07-07T13:57:47+5:302023-07-07T13:58:36+5:30
येत्या ८ आणि ९ जुलै रोजी राज्यात मनसेचे कार्यकर्ते हे आंदोलन करणार आहेत.
मुंबई – २०१९ च्या निवडणुकीनंतर राज्यात प्रचंड उलाथापालथ झाली. निवडणुकीत सोबत असलेले भाजपा-शिवसेना निकालानंतर वेगळे झाले. राज्यात एकमेकांचे कट्टर विरोधी असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आले आणि महाविकास आघाडी निर्माण झाली. त्यानंतर शिवसेना फुटली, राष्ट्रवादीही फुटली. पक्ष आणि चिन्हासह एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी मूळ पक्षावरच घाव घातला. राज्यातील या घडामोडींमध्ये भाजपाचा मोठा वाटा असल्याचे बोलले जाते. राज्यातील याच राजकीय स्थितीवर आता सर्वसामान्य लोक बोलू लागले आहेत. त्यामुळे याला जनआंदोलन बनवण्यासाठी राज ठाकरेंच्यामनसेकडून एक सही संतापाची या आंदोलनाची हाक राज्यभरात देण्यात आली आहे.
येत्या ८ आणि ९ जुलै रोजी राज्यात मनसेचे कार्यकर्ते हे आंदोलन करणार आहेत. याबाबत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं की, सध्या ज्या पद्धतीची राजकीय परिस्थिती पाहतोय त्यात महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय. ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली. ज्या महाराष्ट्राने लोकांना विचार दिले. तिथे ही परिस्थिती झालीय. एकदा तुम्ही मत दिले, तर आम्ही तुम्हाला गृहित धरणार, आम्हाला वाटेल ते करणार या मानसिकतेत राजकीय पक्ष आलेले आहेत असं त्यांनी सांगितले.
तसेच राज्यातील या राजकीय परिस्थितीबाबत तुमच्या मनात चीड आहे. तुमच्या मनात राग आहे, संताप आहे. त्यामुळेच या रागाला, संतापाला वाट करून द्यायची असेल तर येत्या ८ आणि ९ जुलैला आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन घेत आहोत. जर या राजकीय घडामोडींवर तुमचा राग, संताप आणि चीड असेल तर तुम्हाला एक सही करायची आहे. त्यामुळे या संपूर्ण उपक्रमाला एक सही संतापाची असं नाव देण्यात आले आहे. त्यामुळे या आंदोलनातून लोकांनी त्यांचा राग व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात यावे असं आवाहन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिले आहे.
#एक_सही_संतापाचीpic.twitter.com/gkZQryhabV
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 6, 2023
महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील ‘दिगू टिपणीस’ झालाय – राज ठाकरे
अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या ९ नेत्यांनी सरकारमध्ये जात मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले होते. राज म्हणाले होते की, आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला. देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं. बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार? असं राज ठाकरेंनी विचारले होते.