MNS Vs Aaditya Thackeray: टोलनाक्याचा मुद्दा आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी टोलनाक्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. या टीकेला मनसेने उत्तर देताना, बोलण्यापेक्षा आमच्यासारखे करुन दाखवण्याची हिंमत ठेवा, असे आव्हान दिले आहे.
घटनाबाह्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांना लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मुंबईकर म्हणून टोल भरतोय. परंतु पश्चिम द्रुतगती, पूर्व द्रुतगती महामार्गावर खड्डे पडलेत. एकदा सेटलमेंट करून टोलनाके बंद करावेत. MSRDC चं रस्त्यावर काडीमात्र काम करत नाही. त्यामुळे हे टोल बंद करावेत. हे दोन हायवे बीएमसीकडे दुरुस्तीसाठी दिलेत. मग हे टोल का भरायचे. मुंबईकर एक कर बीएमसीला देते मग टोलनाक्याच्या माध्यमातून दुसरा कर कशाला? मुंबईतील पूर्व, पश्चिम द्रुतगती मार्गाची देखभाल होत नसेल तर मग टोल कशाला घेताय? रस्त्यावर खड्डे असतील तर MSRDC टोल कशाला घेते? हे सरकार पडल्यानंतर आमचे नवीन सरकार येणार आहे. ज्यादिवशी सरकार येईल तेव्हा आम्ही टोल बंद करू, या शब्दांत आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला. यावर मनसे नेते अमेय खोपकर यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.
आम्ही बोलत नाही करुन दाखवतो, तशी हिंमत ठेवा
राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात आंदोलन झाल्यानंतर ६५ टोलनाके बंद झाले. आम्ही बोलत नाही करुन दाखवतो. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री असताना टोलनाके बंद करायचे का नाही सुचले? धमक नाही तर फुकाची आश्वासने द्यायची कशाला? असल्या टोलवाटोलवीला लोक कंटाळली आता, तेव्हा नुसते बोलू नका, आमच्यासारखी करुन दाखवायची हिंमत ठेवा, असे ट्विट करत अमेय खोपकरांनी आदित्य ठाकरेंना आव्हान दिले.
दरम्यान, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढत राहणार असा आक्रमक पवित्रा आदित्य ठाकरे यांनी घेतला. मुंबईकरांवर डबल जबाबदारी का? त्यांच्याकडून दुप्पट कर का आकारला जात आहे?, अशी विचारणाही आदित्य ठाकरेंनी केली.