मुंबई - मराठी चित्रपट सृष्टीत ‘आशालता’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गुणी ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे सातारा येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या चित्रीकरणासाठी त्या साताऱ्याला आल्या होत्या. याचठिकाणी त्यांना कोरोनाची लागण झाल्याने अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. कोरोनाच्या संकटात अनेक ठिकाणी मालिकांचे चित्रीकरण सुरू असून टीममधील काही लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याच दरम्यान मनसेने मालिकांचे निर्माते आणि सर्व मनोरंजन वाहिन्यांच्या संचालकांना इशारा दिला आहे.
मालिकांच्या शूटिंगसाठीच्या सेटवर कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्यात हलगर्जीपणा न करण्याबाबत मनसेने इशारा दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी याबाबत एक पत्र लिहिलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरूनही त्यांनी ट्विट केलं आहे. कोविड प्रोटोकॉलच्या पालनात कोणतीही तडजोड, हलगर्जीपणा केल्यामुळे जर अभिनेते आणि तंत्रज्ञ यांच्या जीव धोक्यात येत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना मालिकांच्या चित्रीकरणास ठामपणे विरोध करेल' असं म्हटलं आहे.
...तर मनसे मालिकांच्या चित्रीकरणास ठामपणे करेल विरोध
"आपल्या मनोरंजन वाहिनीच्या तसेच निमिर्तीसंस्थेच्या मालिकांच्या सेटवर कोविड प्रोटोकॉलचे सर्वोतोपरी पालन करणे ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे, याचं भान प्रत्येक मनोरंजन वाहिनीने तसेचं मालिकांच्या निर्मात्यांनी बाळगायलाच हवं. कोविड प्रोटोकॉलच्या पालनात कोणतीही तडजोड, हलगर्जीपणा केल्यामुळे जर अभिनेते आणि तंत्रज्ञ यांच्या जीव धोक्यात येत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना मालिकांच्या चित्रीकरणास ठामपणे विरोध करेल" असं अमेय खोपकर यांनी पत्रात म्हटलं आहे.
सेटवरील सुमारे 27 जणांना कोरोनाची लागण
सातारा जिल्ह्यात सध्या ‘देवमाणूस’, ‘आई माझी काळूबाई’ अशा मालिकांचे चित्रीकरण सुरू आहे. सध्या एका मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘आई माझी काळूबाई’ या अलका कुबल यांच्या मालिकेत आशालता यांची प्रमुख भूमिका आहे. या मालिकेचे चित्रीकरण जिल्ह्यातील फलटण, लोणंद, वाई या परिसरामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू आहे. मालिकेतील एका गाण्यासाठी मुंबईहून एक डान्स ग्रुप आला होता. यातील काहीजणांना कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता असल्याने या मालिकेतील सेटवरील सुमारे 27 जणांना कोरोनाची लागण झाली होती. ते बाधित आढळल्यानंतर मालिकेचे चित्रीकरण थांबविण्यात आले. मात्र, आशालता यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आशालता यांनी मराठी आणि हिंदी अशा 100 हून अधिक चित्रपटांमध्ये केले काम
आशालता या मूळच्या गोव्याच्या असून, त्यांनी कोकणी आणि मराठी चित्रपटांच्या माध्यमातून अभिनयाला सुरुवात केली. त्यांनी आत्तापर्यंत मराठी आणि हिंदी अशा सुमारे 100 हून अधिक चित्रपटांमधून काम केले आहे. ‘गुंतता हृदय हे, वाऱ्यावरची वरात, चिन्ना आणि महानंदा’ यामध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. संगीत नाटक मत्स्यगंधाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या नाटकातील कारर्कीदीस सुरुवात केली. तर बासू चटर्जी यांच्या ‘अपने पराये’या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. याच चित्रपटातील सहायक अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्म फेअरसाठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते. मराठी चित्रपट सृष्टीत ‘उंबरठा, सूत्रधार, नवरी मिळे नव-याला, वहिनीची माया’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात एक छोटीशी चूक ठरू शकते 'जीवघेणी', तज्ज्ञांचा खुलासा
खासदार नुसरत जहाँ यांनी पोलिसांकडे मागितली मदत, म्हणाल्या...
काय सांगता? ...म्हणून एका महिन्यात अयोध्येतील जागांचे भाव झाले 'दुप्पट', आता आहे 'एवढी' किंमत
अलर्ट! ना इंटरनेट बँकिंग, ना पेटीम अकाऊंट तरीही खात्यातून पैसे गायब, वेळीच व्हा सावध
"देश सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांना भाजपसमर्थक मोदीभक्त 'नटी'ने आतंकवादी ठरविले"