सावंतवाडी - एकीकडे राजकारणात सत्तासंघर्ष आणि त्यातून घडणाऱ्या सत्तानाट्यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासमोर अडचणी वाढताना दिसत आहेत. तर दुसरीकडे ठाकरे कुटुंबातील अमित ठाकरेमनसेच्या पुनर्बांधणीकडे लक्ष देताना पाहायला मिळत आहे. मागील महिनाभरापासून अमित ठाकरे सातत्याने पदाधिकारी आणि युवक युवतींच्या भेटीगाठी घेत आहेत. मनसेच्या शाखांमध्ये जात पक्षाला नवी उभारी देण्याचा प्रयत्न करत आहेत.
नुकतेच अमित ठाकरे कोकण दौऱ्यावर गेले आहेत. सावंतवाडीपासून त्यांच्या कोकण दौऱ्याला सुरूवात झाली आहे. पदाधिकाऱ्यांची भेटीगाठी त्यांचे म्हणणं ऐकून घेत आहेत. त्यातून वेळ काढत अमित ठाकरे यांनी सावंतवाडी येथील संवाद बैठका झाल्यानंतर आंबोली घाटात चौकुळ येथे जायचा निर्णय घेतला, त्यांच्यासोबत पर्यावरणस्नेही प्रसाद गावडेही होते. निसर्गरम्य परिसर, सगळीकडे दाटलेलं धुकं, त्यात अधूनमधून बदाबदा कोसळणारा पाऊस, खळाळती नदी आणि केगदवाडीतून दर काही मीटर अंतरावर कोसळणारे कुंभवडे गावचे धबधबे अशा वातावरणात अमित ठाकरे रमून गेले. याठिकाणी ट्रेकिंग करत करत अमित ठाकरे कोकणातील पर्यटनाचा आढावा घेत होते. यावेळी अमित ठाकरेंनी मी इथे कितीही वेळ काढू शकतो. मला पुन्हा पुन्हा इथे यायला आवडेल अशी भावना व्यक्त केली.
सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांशी साधला संवादमनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियानातंर्गत अमित ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. सावंतवाडी येथील मंगळवारी मँगो हॉटेल सभागृहात अमित ठाकरे यांनी मनविसेत नव्याने सक्रिय होऊ इच्छिणाऱ्या तरुणांशी मुक्त संवाद साधला आणि जिल्ह्यात मनविसे भक्कम कशी करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर तिथेच त्यांनी सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला येथील विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी, मनसेचे पदाधिकारी यांच्याशी प्रत्येक तालुक्याबाबत चर्चा केली आणि लवकरच संघटनात्मक पुनर्बांधणी करून जुन्या व नवीन पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन नवीन रचना करण्यात येईल असे स्पष्ट संकेत दिले.
थेट माझ्याशी संपर्क साधा - अमित ठाकरेसावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आमच्या संपर्कात नाहीत, त्यामुळे आम्हाला मार्गदर्शन मिळत नाही. राजसाहेब ठाकरे यांच्या कानावर जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी सांगता येत नाही अशी तक्रार खंत अमित ठाकरे यांच्यापुढे व्यक्त केली. त्यावर "आता यापुढे तुम्ही माझ्या थेट संपर्कात राहू शकता. तुम्हाला गरज पडली तर कधीही माझी वेळ घेऊन राजगड मुख्यालयात येऊन मला भेटू शकता " अशी ग्वाही त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिली.