मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भोंग्यांविरुद्ध घेतलेल्या भूमिकेनंतर राज्यात भोंग्याचा प्रश्न तापला आहे. काही मशिदींनी पुढाकार घेत या मागणीचे स्वागत केले आहे. मात्र, यावरुन चांगलंच राजकारण तापलं आहे. नुकतंच हनुमान जयंतीदिनी या मुद्द्याचा राजकीय परिणाम झाल्याचे दिसून आले. मनसेनं आता भोंग्यांच्या मुद्द्यानंतर सीसीटीव्हीचा मुद्दा समोर आणला आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी जवळपास सर्व मंदिरात सीसीटीव्ही लावले आहेत, पंरतु मशिदीत सीसीटीव्ही आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
“मंदिरांमध्ये सीसीटीव्ही अनिवार्य करण्यासंदर्भात कोणी सूचना कोणी दिलेल्या नाहीत. मंदिरात जर कोणी स्वेच्छेनं, सुरक्षिततेच्या दृष्टीनं जर सीसीटीव्ही लावले असतील आणि अन्य बाकीच्या प्रार्थना स्थळांमध्ये ज्यांना सीसीटीव्ही बसवायचे असतील त्याला सरकारचा विरोध असण्याचं कारण नाही. आपल्या स्वेच्छेनं त्यांनी निर्णय घ्यावा,” असं वळसे पाटील म्हणाले.