अजित पवार सुपारीबाज, तुमच्यासारखे टोप्या घालून राजकारण करत नाही; मनसेची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 12:37 PM2022-05-03T12:37:35+5:302022-05-03T12:38:19+5:30
भोंगे सामाजिक विषय आहे धार्मिक नाही. तुमच्यासारखे टोप्या घालून आम्ही राजकारण करत नाही. प्रत्येकजण आपापले विचार मांडत असतो असं बाळा नांदगावकर म्हणाले.
मुंबई – मनसे प्रमुख राज ठाकरे(MNS Raj Thackeray) यांनी औरंगाबादच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर जातीयवादाचा आरोप केला. राज यांच्या आरोपानंतर राज्यात मनसेविरुद्ध राष्ट्रवादी असं शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांना आम्ही सुपारी दिल्याचं अजित पवार म्हणाले. त्यावर मनसे नेते बाळा नांदगावकरअजित पवार सुपारीबाज नेते आहेत असा समाचार घेतला.
मनसे नेते बाळा नांदगावकर(Bala Nandgoankar) म्हणाले की, अजित पवारांनी(Ajit Pawar) सुपारी दिली असं ते म्हणतात ते सुपारीबाज आहेत. शिवसेनेलाही सुपारी दिलीय का? स्वत:चं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पाहायचं वाकून ही अजित पवारांची प्रवृत्ती आहे. आमचा फायदा तुम्हाला झाला. तुम्ही काय दिले आम्हाला? आम्ही वैयक्तिक कामं घेऊन आलोय का?. जे चुकीचे आहे त्यावर राज ठाकरे भूमिका मांडतात. भोंगे सामाजिक विषय आहे धार्मिक नाही. तुमच्यासारखे टोप्या घालून आम्ही राजकारण करत नाही. प्रत्येकजण आपापले विचार मांडत असतो. तुम्ही ज्यांच्यासोबत सत्तेत आहात सगळ्यांचे विचार वेगळे आहेत मग काय टायमिंग पाहून विचार मांडता का? असा टोला त्यांनी लगावला आहे.
तसेच कोण कोणाचं उपवस्त्र आहे हे सांगण्याची गरज नाही. ते सगळ्यांना माहिती आहे. आतापर्यंत आम्ही एकला चलो रे भूमिका मांडली आहे. सत्तेसाठी आम्ही तडजोडी करत नाही. विचारांवर आणि भूमिकांवर आम्ही ठाम आहे. राज्यात दंगली घडवण्याचा विषयच नाही. पोलिसांच्या आडून तुम्ही धुव्रीकरण केले जात आहे. सुप्रीम कोर्टानं सकाळी ६ ते १० पर्यंत भोंगे लावण्याची परवानगी द्यावी असं सांगितले आहे. परवानगी महिना-दोन महिन्याची असते का? असा सवाल मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवसेना नेते संजय राऊतांना विचारला आहे.
काय म्हणाले अजित पवार?
राज ठाकरे यांच्या सभेला जास्त महत्त्व द्यायचं कारण नाही. कारण ती पूर्वीचीच कॅसेट होती. शरद पवार जातीयवादी आहेत वैगेरे. तुमचं जेवढं वय आहे तितके पवारांचं राजकारण झालंय. जर कोणी धादांत खोटं बोलत असेल तर अशा सभेला महत्त्व का द्यायचं? असं सवाल अजित पवारांनी करत लोकसभेच्यावेळी आपली सुपारी घेतली होती. आता त्यांची सुपारी घेतली असं विधान केले. परंतु त्यानंतर लगेच सुपारी घेतली असं नाही तर आघाडी उमेदवारांच्या पाठिंब्यासाठी बोलत होते, मी माझे शब्द मागे घेतो असं अजित पवारांनी म्हटलं.